नाशिक : नाशिक शहरात (Nashik) पुढील दोन वर्ष 70 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी न देण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. 70 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याची तरतूद असली तरी या इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक असलेली 90 मीटर उंचीची अग्निशामन शिडी खरेदी (Hydraulic platform) प्रक्रिया तांत्रिक अडचणीत सापडल्याने हा निर्णय घेतल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे.


राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने संपूर्ण राज्यासाठी 2019 मध्ये एकीकृत विकास नियंत्रण नियमावली लागू केली. त्यामुळे नाशिक शहरात 70 मीटर पेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे नाशिकचे नागरिकरण झपाट्याने होणार आहे मुंबई, पुणेनंतर नाशिकला आता सेकंड होम (Second Home) म्हणून पसंती मिळत आहे. त्यामुळे मुंबई (Mumbai) पुण्यातील नागरिकांचा घर खरेदीचा कल हा नाशिकमध्ये (Nashik) वाढत चालला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये मोठमोठे प्रकल्प देखील उभे राहत आहे. मात्र अशा इमारती उभ्या राहिल्यानंतर आगीच्या काही घटना घडल्यास शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हायड्रोलिक शिडीची आवश्यकता भासत असते. त्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागाने 90 मीटर उंचीची अग्निशमन शिडी अर्थात हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी प्रक्रिया राबवली होती. त्यानुसार सन 2021 च्या वार्षिक अंदाजपत्रकात 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. 


सन 2008 मध्ये महापालिकेने (Nashik NMC) 32 मीटर उंचीची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म खरेदी केली होती. त्याचा उपयोग झाला नसला तरी हायड्रोलिक लेडर खरेदी करणे देखील महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे 70 मीटर उंचीच्या इमारती होणार असल्याने ही शिडी आवश्यक होती. मात्र सद्यस्थितीत शिडी खरेदी अडकून पडल्याने खरेदी करेपर्यंत 70 मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. गगनचुंबी इमारतींना परवानगी देण्याची तरतूद असली तरी या इमारतींमध्ये आग अथवा अन्य काही दुर्घटना घडल्यास आपत्ती निवारणासाठी आवश्यक 90 मीटर उंचीची अग्रिशमन शिडी खरेदी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पुढील दोन वर्षे नाशिक शहरात 70 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 


शिडी खरेदी अडकली कुठं?


नाशिकच्या अग्निशमन विभागाने 90 मीटर उंचीची हायड्रॉलीक प्लॅटफॉर्म खरेदीची निविदा काढली होती. निविदेत परराष्ट्रीय कंपनीला पात्र कार्यारंभ आदेश दिले होते. सदर कंपनीमार्फत 31 मे 2023 पर्यंत अग्रिशमन शिडीचा पुरवठा केला जाणार होता. मात्र कालांतराने ही कंपनीच दिवाळखोरीत निघाल्याने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला वाहन मिळाले नाही. 90 मीटर उंचीची हायड्रॉलीक प्लॅटफॉर्म महापालिकेला प्राप्त होण्यासाठी सदरची निविदा प्रक्रिया नव्याने राबविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे महापलिककेने तूर्तास 70 मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.