नाशिक : नाशिकसह राज्यभरात भाविक सप्तशृंगी देवीच्या (saptshrungi Devi) दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी काम करणे महत्वाचे आहे. म्ह्णून श्री सप्तशृंगी देवी संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला लवकरच मंजुरी दिली जाईल. येत्या सोमवारी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 81 कोटी 86 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाशिकमध्ये केली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून कळवण शहरात शेतकरी सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. कळवणला येण्यापूर्वी अजित दादांनी सप्तशृंगी गडावर जात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यानंतर ते कळवणला रवाना झाले होते. येथील मेळाव्यात बोलताना त्यांनी सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. अजित पवार यावेळी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत बैठक होणार असून आजच्या दिवशी शब्द देतो की, सोमवारी 81 कोटी 86 लाखाचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झालेल्या तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळेल, अशी घोषणाच यावेळी अजित पवार यांनी केली.
अजित पवार पुढे म्हणाले की, श्रद्धा, निष्ठा ठेवून काम केले पाहिजे, मोठा भक्तगण गडावर दर्शनासाठी येत असतो. त्यामुळे गडावर अनेक प्रकारच्या सोयीसुविधा करणे आवश्यक आहेत. छगन भुजबळ या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मला आठवतंय लोकांना चालत जावं लागायचं, भाविकांना त्रास व्हायचा, आता रस्ते रुंद झालेले आहेत, वर जाण्याकरता सोय झालेली आहे. ज्या काही सुविधा देता येतील, त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील मी तिथे जात असताना माझ्याबरोबर सगळे मान्यवर होते, मी तोच विचार करत होतो की, अजून उद्याच्याला भाविकांना तिथं काय केलं पाहिजे? काय केल्यानंतर भाविकांना अधिक सोयीचं होणार आहे. दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये कुठलाही अडचण येणार नाही. नितीन पवार यांनी सांगितले की गडावर काय काय सुविधा करता येतील, यासाठी आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. त्या प्लॅनला देखील तुम्ही मंजुरी दिली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मिटींग लागलेली आहे. या मीटिंगमध्ये आराखड्याला मंजुरी दिली जाईल असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
आमदार नितीन पवार झाले भावूक
उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यात कळवण भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. येथील आमदार नितीन पवार हे दादांसमवेत असून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कामाच्या भूमिपूजनसाठी अजित पवारांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविक करत असताना नितीन पवार यांनी मागण्यांचा पाढा वाचलाच, शिवाय काही वेळ भावुकही झाल्याचे पाहायला मिळाले. नितीन पवार म्हणाले की, आमचा मतदारसंघ हा आदिवासी बहुल भागात येत असून जिल्हा परिषद शाळांची वाईट अवस्था झाली असून शासन किंवा सीएसआरच्या माध्यमातून शाळांची दुरुस्ती करावी. तसेच नाशिक दिंडोरी कळवण रस्ता चौपदरी व्हावा, सिहंस्थ कुंभमेळ्यात चांगला होईल, सुरगाणा तालुक्यातील उंबरठाणला ग्रामीण रुग्णालय व्हावं, वसाका कारखाना सुरु करावा, सोलापूरच्या अभिजित पाटील यांनी सुरवात केली होती, मात्र दोन तीन वर्षात बंद पडला. मतदारसंघात असंख्य आदिवासी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत. या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी करावी, या मागण्या केल्या. तर तसेच ते म्हणाले की अगदी सुरवातीपासून दादांसोबत असून शेवटपर्यंत राहणार आहे, माझ्या मंडळींमुळे ही जनता आली आहे, मी काम करतो, निधी आणतो, मात्र माणसं तिच्यामुळे आल्याचे सांगत नितीन पवार भावुक झाले.
इतर महत्वाची बातमी :