Nashik Jindal Company Fire: अखेर नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग 56 तासांनंतर आटोक्यात, संभाव्य धोका टळला; आतापर्यंत काय-काय घडलं?
Nashik Jindal Company Fire: नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती.

Nashik Jindal Company Fire: नाशिकच्या जिंदाल कंपनीला (Jindal Company) लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगीमुळे (Fire) होणारा संभाव्य धोका टळला आहे. आग ज्या गॅस टँक आणि इतर केमिकल टँकपर्यंत जाणार होती. तिथपर्यंत आता आग जाणार नाही. आग पसरु नये, यासाठी टँकच्या जवळील ज्वलनशील कच्चा माल दूर करण्यात आला असल्याची माहिती नाशिक महापालिका (Nashik NMC) अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे यांनी दिली आहे. त्यामुळे 55 ते 56 तासात आग नियंत्रणात आणण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसून येत आहे.
अग्निशमन विभागाचे प्रभारी अधिकारी प्रदीप बोरसे म्हणाले की, अर्धा पाऊण तास महत्वाचा होता. गॅस टँकपर्यत अर्धा पाऊण तासात आग पोहचणार होती. मात्र, तत्काळ उपाययोजना केल्या. रस्त्यातील मटेरियल दूर केले आणि आग पुढे गेली नाही. लाखो लिटर पाणी आणि लाखो लिटर फोमचा वापर करण्यात आला. आजूबाजूच्या कंपनीमधून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यात आली. कंपनीमधील सर्व टँक आता सुरक्षित आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
अखेर आग नियंत्रणात, अग्निशमन विभागाची माहिती
प्रदीप बोरसे पुढे म्हणाले की, आजूबाजूच्या नागरिकांना आता दूर जाण्याची गरज नाही. सुरुवातीला काळा रंगाचा धूर दिसत होता, आग भडकत होती. त्यामुळे धूर काळा होता, आता धूर काळ्या रंगाचा दिसत माही, करडा ग्रे कलरचा धूर दिसत आहे. आता धुराचे रंगही बदलला असल्यानं आग नियंत्रणात असून कुलिंगचे काम सध्या सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
56 तासांत काय-काय घडलं?
दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे अनेक बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र, कंपनीच्या आगीला 56 तास उलटूनदेखील आग नियंत्रणात आलेली नव्हती. फिल्म्स आणि पीव्हीसी मटेरियल हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढतच असल्याचे सांगितले जात होते.
आगीच्या धुराचे मोठ्या प्रमाणात लोट
नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यांतून अग्निशमन दलाच्या गाड्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. फोम आणि पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तर आकाशात आगीच्या धुराचे लोट मोठ्या प्रमाणात पसरले होते. आगीची तीव्रता वाढतच चालली होती.
फोम व पाण्याची फवारणी
प्रॉपेन गॅसची टाकी आणि एलपीजी गॅसच्या टाकीला आग लागू नये, यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. प्रॉपेन गॅस टाकीला आग लागून स्फोट झाल्यास पंधरा किलोमीटरचा परिसर उद्ध्वस्त होऊ शकत होता. या गॅस टाकीचा ब्लास्ट होऊ नये, यासाठी अग्निशमन दलाकडून या टाकीच्या परिसरात सातत्याने फोम व पाण्याची फवारणी केली जात होती. तर या आगीत दोन कामगार जखमी झाल्याचे समोर आले होते.
कंपनीपासून तीन किमी परिसर निर्मनुष्य
यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली असल्याचे पाहावयास मिळाले. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीपासून तीन किमी परिसर निर्मनुष्य म्हणजे गावे खाली करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. परिसरातील मुंढेगाव, शेनवड खुर्द, बळवंतनगर, मुकणे, पाडळी आदी गावांतील नागरिकांना गाव खाली करण्याचा आदेश देण्यात आला होता. परिसरातील गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम व भारतीय दंड संहिता अंतर्गत कारवाई करण्यात येईल. हा आदेश 21 मे 2025 पासून वरील आपत्ती निवारणापर्यंत लागू राहील, असे पत्र जारी करण्यात आले होते.
संभाव्य धोका टळला
गॅस टाक्यांच्या स्फोट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन किमीचा परिसर खाली करण्याचा आदेश दिल्यानंतर परिसरातील पाडळी, मुकणे, शेनवड, मुंढेगाव, बळवंतनगर आदी परिसरातील दुकाने बंद केली असून, गुरुवारी दुपारपर्यंत जवळपास 80 टक्के गाव खाली करण्यात आले. या भीषण घटनेने या कंपनीत काम करणारे तीन ते साडेतीन हजार परप्रांतीय कामगारांना कंपनीने कालच बाहेर काढल्याने या कामगारांवर बेरोजगारीची कुन्हाड कोसळली आहे. मिळेल त्या वाहनाने हे कामगार आपल्या मूळ गावी परतताना दिसून आले होते. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगीमुळे होणारा संभाव्य धोका टळला आहे.
आणखी वाचा























