नाशिक : शिर्डी (Shirdi) येथून भाविकांना घेवून सप्तशृंगी गडाकडे (Saptshrungi Gad) दर्शनासाठी जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला घाट रस्त्यावरील गणपती टेकडीजवळ काल (दि. 20) रात्री अचानक आग (Fire) लागली. या आगीत टेम्पो ट्रॅव्हलर संपूर्ण जळून खाक झाली. यावेळी वाहनातील प्रवासी भाविकांनी प्रसंगावधान राखून वाहनातून सुखरुप बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आज रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे नांदुरी ते सप्तशृंगी गड या रस्त्याने गडावर जात असताना वाहनाच्या इंजिनमधून अचानक धूर आला. वाहनातून धूर निघत असल्याने चालकांनी तत्काळ वाहन थांबवले. यावेळी प्रवाशांनीही सतर्कता बाळगून वाहनातून पटापट बाहेर पडले.
काही क्षणात ट्रॅव्हलरने घेतला पेट
यांनतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. यावेळी मार्गावरुन गडावरून येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिकांनी याबाबतची माहिती ट्रस्ट व ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थ, ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापनाचे जवान व रोप वे ट्रॉलीचे कर्मचारी यांनी अग्निशामक यंत्रासह घटनास्थळी धाव घेतली.
बसमध्ये एकूण 21 प्रवासी
यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा टँकरला पाचारण केले. आपत्ती व्यवस्थापन पथक व रोप वे ट्रॉली येथील कर्मचारी यांनीही अग्निशामक यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला. वाहनात 2 चालक, 10 महिला, 9 पुरुष असे एकूण 21 प्रवासी होते. हे सर्व भाविक शिर्डी येथून साई दर्शन घेवून भाडोत्री टेम्पो ट्रॅव्हलरने वणी गडावर देवी दर्शनासाठी येत होते.
इतर महत्वाच्या बातम्या