Pune Car Accident पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. 


अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याचदरम्यान काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी-


अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे. इतरवेळी हेल्मेट घातलं नसताना कारवाईचा दंड ठोठवणारे पोलीस मार्चपासून ही कार विनाक्रमांक धावतेय, हे का बघू शकले नाही?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. 


मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही-


मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याचा परवानाही नाही, तरीदेखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली, तसेच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करीत असल्याचेही वडिलांना माहिती आहे, असे अल्पवयीन आरोपीने सांगितले. चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना ही माहिती दिली.


भारतात पोर्शे कारची किंमत किती आहे?


पोर्शे कारची किंमत ₹ 88.06 लाख पासून सुरू होते आणि भारतात ही किंमत 1.86 कोटींपर्यंत जाते . सर्वात कमी किंमतीची कार Macan मॉडेलची आहे. जिची किंमत ₹ 88.06 लाख आहे. पोर्शेची सर्वात महागडी कार 911 आहे ज्याची किंमत 1.86 कोटी रुपये आहे. भारतातील पोर्शे SUV मध्ये Macan, Cayenne आणि Macan Turbo EV यांचा समावेश आहे.


संबंधित बातम्या:


मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरण, आमदार सुनील टिंगरे अखेर समोर, पहिल्या प्रतिक्रियेत सविस्तर सांगितलं!


पोर्शे कारने दोघांना चिरडलेल्या धनिकपुत्राला पोलिसांची रॉयल ट्रिटमेंट, आरोपींसाठी पिझ्झा बर्गरची व्यवस्था