नाशिक : नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील (Byto College) प्राचार्यांच्या कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकाने प्राचार्यांसह कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यात महाविद्यालयातील कर्मचारी, विद्याथी व प्राचार्य जखमी झाले असून, उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) संशयित विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय बोराडेसह एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान महाविद्यालयात असला प्रकार घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दोन विद्यार्थ्यांच्या वाद झाले असता ते प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये सोडवायला जात होते. यानंतर हा प्रकार घडला आहे. जखमी कर्मचारी नितीन कैलास देवडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात विद्यार्थी मयूर विजय बोराडे, त्याचे वडील विजय बोराडे आणि एक अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये वाद
गुरुवारी (दि. २२) दुपारी पावणेदोनच्या सुमारास नितीन देवडे बिटको महाविद्यालयात ड्युटीवर असताना महाविद्यालयातील वर्गाच्या दिशेने जोराचा ओरडण्याचा आवाज आला. देवडे तेथे गेले असता मयूर बोराडे व अभयसिंह चौहान यांच्यामध्ये भांडण झाल्याचे निदर्शनास आले. देवडे दोघांना घेऊन प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी कार्यालयात वाद मिटवण्यासाठी घेऊन गेले. प्राचार्य यशस्वीपणे वाद मिटवत असताना मयूर बोराडेचे वडील विजय बोराडे व एक लाल रंगाचा शर्ट घातलेली अनोळखी व्यक्ती यांनी प्राचार्य कार्यालयात घुसखोरी केली.
हल्लेखोरांनी प्राचार्यांना केली मारहाण
दमदाटी करत बेसबॉल स्टीक व लाकडी दांडक्यांनी देवडे व विद्यार्थी अभयसिंह चौहान यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. यावेळी चौहान हा बेशुध्द झाला. नंतर हल्लेखोरांनी प्राचार्य कुलकर्णी यांना मारहाण करत कार्यालयात तोडफोड केली. विजय बोराडे याने आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले असता पदाधिकाऱ्यांनी मात्र बोराडेशी कुठलाही संबंध नसल्याचे म्हटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विजय बोराडे व अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाल्या प्राचार्य ?
दरम्यान, याबाबत प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी म्हटले की, दोन विद्यार्थ्यांमध्ये दुपारी वाद झाला. तो मिटवण्यासाठी कर्मचारी दोघांना माझ्या कार्यालयात घेऊन आले. त्यांना मी समजावून सांगत असताना अचानक अनोळखी व्यक्तींनी माझ्या कार्यालयात घुसखोरी करून धुडगूस घातला व दांडक्याने मारहाण सुरू केली. त्यात एक कर्मचारी आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाला. मलाही मार लागला. शैक्षणिक संस्थेत अशी गोष्ट घडणे अत्यंत निषेधार्थ आहे. ज्यांनी हे गैरकृत्य केले त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. जखमी विद्यार्थी अभयसिंह चौहान म्हणाला, मी महाविद्यालयात दुपारी डबा खात असताना मयूर बोराडे हा विद्यार्थी आला. गैरसमजातून त्याने मला मारहाण केली. मी प्राचार्य कार्यालयात तक्रार करायला गेलो असता मयूर बोराडे, त्याचे वडील विजय बोराडे आणि अन्य एक व्यक्ती तेथे आला. त्यांनी बेसबॉलची बॅट, रॉडने मला मारहाण सुरू केली. डोक्यात घाव लागल्याने मी बेशुद्ध पडल्याचे त्याने सांगितले.
आणखी वाचा