नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group), शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT), भाजप (BJP) पाठोपाठ आता नाशिकमध्ये (Nashik News) काँग्रेसचा (Congress) पदाधिकारी मेळावा आज पार पडत आहे. मात्र या मेळाव्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग्जवर आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचा फोटो वगळल्याने काँग्रेसची गटबाजी उघड झाल्याचे दिसून येत आहे. 


नाशिकमध्ये काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा आज पार पडत आहे. या मेळाव्याला काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्त्व आहे. 


काँग्रेसमधील गटबाजी उघड


या मेळाव्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग्जवर आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार  हिरामण खोसकर आहेत. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याच्या संशयवरून आमदार हिरामण खोसकर चर्चेत आले आहेत. हिरामण खोसकर यांचा फोटो वगळण्यात आल्याने मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. आज होणाऱ्या बैठकीत हिरामण खोसकर यांच्याबाबत काही निर्णय होणार  का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण 


दरम्यान, आजच्या बैठकीत नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.  मात्र या बैठकीआधी हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. हिरामण खोसकर यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या काँग्रेसच्या बैठक आणि पदाधिकारी मेळाव्याला ते अनुपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


हिरामण खोसकरांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट


काही दिवसांपूर्वी आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे हिरामण खोसकर काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत हिरामण खोसकर यांनी एबीपी माझाशी बोलताना मी काँग्रेससोबत होतो आणि काँग्रेससोबतच राहणार आहे. मला उमेदवारी मिळणार आहे. मी निधीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. 


आणखी वाचा 


Congress MLA Meets CM: हायकमांडच्या रडारवर असलेले काँग्रेसचे 'ते' दोन आमदार रात्री गुपचूप एकनाथ शिंदेंना भेटले, बातमी बाहेर येताच म्हणाले...