नाशिक : गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. मराठा आंदोलकांकडून राज्यभरात विविध लोकप्रतिनिधींना अडवले जात आहे. आज नाशिकमध्ये काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडत आहे. यासाठी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मराठा आंदोलकांनी अडवलं आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.  


नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आंदोलकांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना मराठा आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यानंतर नाना पटोले यांच्या गाडीत असलेले काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांना अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांकडून करण्यात आला.


मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी


त्यानंतर मराठा आंदोलकांनी कार्यक्रमस्थळाबाहेर नाना पटोले यांना घेरलं. मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांची गाडीखाली उतरून भेट घेतली. मराठा आंदोलकांसोबत चर्चा करताना नाना पटोले यांनी आम्ही तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत, असे आश्वासन दिले. आगामी काळात आम्हीदेखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आग्रही आहोत. हा लढा आम्ही देखील लढणार आहे, असे देखील नाना पटोले यांनी मराठा आंदोलकांना सांगितले. तर नाना पटोले यांच्यासोबत बोलताना मराठा आंदोलकांनी विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. सक्षम विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला द्या, अशी विनंतीदेखील मराठा आंदोलकांनी नाना पटोले यांच्याकडे केली. 


नाशकात काँग्रेसमधील गटबाजी उघड


दरम्यान, नाशिकमधील मेळाव्याच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या अनेक होर्डिंग्जवर आमदार हिरामण खोसकर यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार  हिरामण खोसकर आहेत. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याच्या संशयवरून आमदार हिरामण खोसकर चर्चेत आले आहेत. हिरामण खोसकर यांचा फोटो वगळण्यात आल्याने मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. आज होणाऱ्या बैठकीत हिरामण खोसकर यांच्याबाबत काही निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


आणखी वाचा 


Nana Patole : बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप