नाशिक : तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलीस स्टेशन (Ambad Police Station) हद्दीत घडली. दरम्यान, आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल सखाराम वाकडे (56, व्यवसाय ट्रान्स्पोर्ट, रा. श्रीजी बंगला क्र. 57, पाणिनी सोसायटीच्या मागे, वसंतनगर, राणेनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गौरव अच्छेराम मिश्रा (37, रा. मिश्रा हाऊस, महालक्ष्मीनगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, नाशिक) याने 2018 मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. 


रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष


आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. 


1 कोटीचा गंडा


वाकडे यांनी मिश्रा याच्या विश्वासाने भारावून जाऊन त्याला एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मित्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. दि. 13 ऑक्टोबर 2024 रोजी मिश्राने वाकडे यांना आगरा हॉटेल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावले, तेथे 10-12 गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मित्राने वाकडे यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी देण्यात आली. 


5 लाखांच्या खंडणीची मागणी 


त्याने वाकडे यांना पैसे विसरून जाण्यास सांगितले. तसेच त्यांच्याकडून दरमहा 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. वाकडे यांना माहिती झाले की, इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये मिश्रा याच्याविरुद्ध बनावटपणाचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


खासगी वाहनावर लावला 'दिवा'


दरम्यान, तोतया आयपीएस अधिकारी गौरव मिश्रा याचे काही सरकारी अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याने त्याचाच गैरफायदा घेत गौरव मिश्रा याने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांसह सरकारी अधिकाऱ्यांनादेखील या तोतयाने लाखो रुपयांना गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे. गौरव मिश्रा हा त्याच्या खासगी वाहनावर पोलीस गाडीवर असलेला दिवा वापरत होता. त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांची 'वर्दी' वापरत होता तर गौरव मिश्रा हा तोतया अधिकारी बनून चक्क पीटीसी येथील दिक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गेल्याचे समजते. 


आणखी वाचा 


Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं