नाशिक : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. कारण 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर निवडून आलेले विद्यमान आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत महायुतीतील (Mahayuti) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP Ajit Pawar Group) प्रवेश केला. हिरामण खोसकर यांना अजित पवार गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसने लकी जाधव (Lucky Jadhav) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात हिरामण खोसकर यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.
मागील वर्षी झालेल्या राज्यसभा आणि त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस व्होटिंगमुळे हिरामण खोसकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे खोसकर इतर पर्यायांच्या शोधात होते. अखेर हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. हिरामण खोसकर यांनी पक्ष प्रवेश करताच त्यांना अजित पवार यांच्याकडून इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली.
इगतपुरी काँग्रेसचा बालेकिल्ला
या मतदारसंघात 1980 पासूनचा आढावा घेतल्यास 1980, 1985, 1995, 2009 आणि 2014 अशा पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. 1999 आणि 2004 या सलग दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकला होते. 1999 मध्ये पांडुरंग गांगड, तर 2004 मध्ये काशीनाथ मेंगाळ यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला. 1990 च्या एकाच निवडणुकीत यादवराव वांबळे यांच्या रूपाने भाजपचे कमळ फुलले आहे.
2019 विधानसभा निवडणुकीतील स्थिती
• हिरामण खोसकर (काँग्रेस) : 86,561
• निर्मला गावित (शिवसेना) : 55,006
• लकी जाधव (वंचित बहुजन आघाडी) : 9,975
• योगेश शेवरे (मनसे) : 6,566
काँग्रेसच्या लकी जाधवांचा पराभव
दरम्यान, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकीकडे हिरामण खोसकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेघाळ आणि काँग्रेसचे लकी जाधव, गोपाळ लहांगे, उषा बेंडकोळी, वैभव ठाकूर हे इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेसने लकी जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र हिरामण खोसकर यांनी लकी जाधव यांचा पराभव केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या