मुंबई: मुंबईच्या वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे भीषण चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला होता. या दुर्घटनेत तब्बल 10 जण जखमी झाले होते. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दोघांचा जीव वाचला असला तरी त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. रविवारी पहाटे वांद्रे  ते गोरखपूरला जाणारी अंतोदय एक्सप्रेस ट्रेन वांद्रे टर्मिनसवरील (Bandra Terminus) फलाट क्रमांक एकवर आली तेव्हा हा प्रकार घडला होता. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आणि त्यामधून चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या भीषण चेंगराचेंगरीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. हे CCTV फुटेज पाहून या घटनेच्या भीषणतेचा अंदाज येऊ शकतो.


CCTV फुटेजमध्ये जी दृश्य दिसत आहेत, त्यानुसार प्रवासी हे ट्रेन फलाटावर आली तेव्हा डोक्यावर बॅग आणि सामान घेऊन गाडीत चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, रेटारेटीमुळे कोणालाच ट्रेनमध्ये चढता येत नव्हते. अनेक प्रवाशांच्या हातात लहान ड्रम होते. त्यामुळे वांद्रे-गोरखपूर एक्स्प्रेस ट्रेनच्या दारापाशी प्रचंड गर्दी झाली होती. दरवाजातून कोणालाच आत शिरता येत नसल्याने प्रवाशी खाली पडले. या सगळ्यातून चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. अनेक प्रवाशी चेंगरले जाऊन त्यांना गंभीर दुखापत झाली.


या घटनेचा एक  व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एक प्रवासी रक्तबंबाळ अवस्थेत फलाटावर पडून होता. त्याच्या मांडीचे हाड तुटल्यामुळे पाय जायबंदी झाला होता आणि त्यामधून प्रचंड रक्तस्राव सुरु होता. मात्र, या परिस्थितीमध्येही इतर प्रवाशी ट्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. या दुर्घटनेसाठी रेल्वे पोलिसांना गर्दीचे नियोजन करण्यात आलेले अपयश कारणीभूत धरले जात आहे. वांद्रे टर्मिनसवर प्रचंड गर्दी असूनही रेल्वे पोलिसांनी योग्य ती खबरदारी का घेतली नाही,याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. मात्र, ही घटना घडली तेव्हा फलाटावर सीआरपीएफ, जीआरपीएफ आणि होमगार्डचे मिळून 50 ते 60 कर्मचारी तैनात होते, असा दावा रेल्वे विभागाकडून केला जात आहे.


 वांद्रे-गोरखपूर अंतोदय एक्स्प्रेसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी


वांद्रे टर्मिनसपासून निघणारी आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पोहोचणारी ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित होती. या एक्स्प्रेस ट्रेनचे सर्व 22 डबे अनारक्षित होते. त्यामुळे गरीब मजूर वर्गाने या ट्रेनने जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या रेल्वेची प्रवासी क्षमता ही 2036 होती. मात्र रेल्वे अनारक्षित असल्यामुळे एकूण 2540 तिकिटांची विक्री करण्यात आली. म्हणजेच क्षमतेपेक्षा साधारण 500 अतिरिक्त प्रवाशांना तिकीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हेदेखील चेंगराचेंगरीच्या घटनेचे प्रमुख कारण मानले जात आहे. 


VIDEO: वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीचे सीसीटीव्ही फुटेज



आणखी वाचा


क्षमता 2000, तिकिटं 2500 अन् लोकांची घरं बांधणारा तरणा इंद्रजित आयुष्यातून उठला; वांद्र्यातील चेंगराचेंगरीची अस्वस्थ कहाणी!


वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर हौशा-गवशांना बंदी