Nashik Dengue Update : नाशिक महानगरपालिकेत (Nashik NMC) गेल्या पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, वैद्यकीय रजेवर असताना इकडे शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. शहरात डेंग्यू (Dengue) रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, रुग्णसंख्या थेट 900 पार पोहचल्याचे विदारक चित्र आहे. दरम्यान, डेंग्यूपुढे महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने (Health Department) गुडघे टेकले असून सुरू असलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. 


या महिन्यात 323 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली असून, ऑगस्ट अखेर या आकडेवारीत कमालीची वाढ होण्याची भीती आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या सूचनांचा काही एक उपयोग होताना दिसत नसून, उत्तरोत्तर रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य विभागाकडून डेंग्यू संशयित रुग्णाच्या घरी व घर परिसरात भेटी देऊन पाणी साठे तपासले जात आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पाणीसाठे रिकामे करणे, अॅबेटिंग करणे आदी कार्यवाही केली जाणार आहे. नागरिकांनी डास प्रतिबंधक कार्यवाहीच्या मोहिमेत सहकार्य करावे, आपापल्या घरात व परिसरात डास उत्पत्ती स्थाने तयार होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. 


सहाशे नागरिकांना नोटिसा


शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या डेंग्यू रुग्णांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाने सहाशे नागरिकांना नोटिसा बजावल्या आहेत. मनपाच्या मोहिमेत 3050 घरांमध्ये आढळली डास उत्पत्ती स्थाने आढळून आली. डास प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी 175 विशेष गट स्थापन करून शहरभर संशयित डेंग्यू रुग्ण व डास उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान विशेष पथकाव्दारे दोन लाखांहून अधिक घरांना भेटी देण्यात आल्या. महानगरपालिकेतर्फे नागरिकांना डेंग्यूबाबत माहिती दिली जात आहे. तसेच महानगरपालिकेतर्फे कीटकजन्य आजार रोखण्यासाठी कार्यवाही तीव्र करण्यात आलेली आहे.


डेंग्यूची रुग्णसंख्या 900 पार 


डेंग्यूचा आलेख कमी होण्याऐवजी तो वाढतच असल्याचे चित्र आहे. शहरात या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर डेंग्यू रुग्ण संख्या कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आता रुग्णसंख्या 900 पार पोचल्याचे दिसत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Dengue Update : पालकमंत्री दादा भुसेंच्या बैठकीनंतरही नाशकात डेंग्यूची परिस्थिती जैसे थे, चाचण्या रखडल्या


Health : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया सोबत फुफ्फुसांशी संबंधित आजारांचा धोका का वाढतो? आरोग्य तज्ज्ञ सांगतात...