नाशिक : निफाड तालुक्यातून (Niphad Taluka) धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोनेवाडी बुद्रुक येथे सासरच्या छळाला कंटाळून 27 वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षाच्या बाळासह शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामकृष्ण गाजरे यांची मुलगी सुजाता हिचा विवाह 19 जून 2019 रोजी सोनेवाडी बुद्रुक येथील भूषण निश्चित यांच्याशी झाला होता. विवाहानंतर सासरी सातत्याने छळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. माहेरून पैसे आणावेत, काम करत नाही, झोपून राहते, अशा विविध कारणांनी सातत्याने तिला त्रास दिला जात असे.
विवाहितेने दीड वर्षाच्या मुलासह संपवली जीवनयात्रा
या त्रासाला कंटाळून सुजाता भूषण निश्चित (27) हिने त्यांच्या शेतातील शेततळ्यात दीड वर्षाच्या मुलासह उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. शेततळ्यामध्ये पाणी भरलेले असल्यामुळे चांदोरी येथून आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकातील स्वयंसेवकांनी शेततळ्यात उतरुन बुडालेल्या मायलेकाचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी निफाड पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सुजाताचा पती, सासू-सासरे, दीर आणि जाऊ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
अंगावर झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
शहरातील शिवाजीनगर येथे एका दुचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तुषार रघुनाथ पवार हे शिवाजीनगर येथून कामावरून घरी जात होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना गुलमोहोराचे एक झाड पवार यांच्या दुचाकीवर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. झाड कोसळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवली असता अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
इतर महत्वाच्या बातम्या