Nagpur Crime :  नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता.  मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यातच मंगळवारी 25 जूनच्या रात्री हा वाद एवढा विकोपाला गेला होता. या वादातून संतापाच्या भरात आरोपी दिलप्रीत सिंगने पत्नी मन्नतवर लोखंडी रॉडने  वार करून तिला ठार केले. 


या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे. विशेष म्हणजे हत्येच्या एक दिवसापूर्वीच मन्नत विर्क हिने आपल्या भावासह पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत मनप्रीत विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला पती दिलप्रीत पासून धोका असल्याची तक्रार मन्नतने दिली होती. मात्र पोलिसांनी वेळेत कारवाई केली नाही आणि दुसऱ्याच दिवशी मन्नत विर्कची हत्या झाली. 


घरात कुणीही नसताना प्रियकराने महिलेला संपवलं, विरारमधील घटना


विरारमध्ये एका खळबळजनक हत्येची (Crime News) घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील विरार येथील यात एका विवाहित महिलेची साडीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मध्यरात्री विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. दोघांमधील किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येपर्यंत गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली.


धनश्री आंबडस्कर (वय 32 वर्ष) ही महिला रुपेश आंबडस्कर (वय 37 वर्ष ) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता. तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा  धनश्रीच्या घरी आला होता.  त्यावेळी दोघामध्ये भांडण झालं आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव  रचून तिला जवळचा रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केलं.