नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये (Nashik) समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) सध्या चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनेकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे.  


भुजबळ फार्मवरील सुरक्षेत वाढ


ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. 


असा असणार मनोज जरागेंच्या शांतता रॅलीचा मार्ग


मंगळवारी 13 तारखेला सकाळी तपोवन, नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. तपोवन जुना आडगाव नाका - निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल यामार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील. त्यानंतर सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होईल. 


आणखी वाचा 


मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप, नाशिकमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर