नाशिक :  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)  यांच्या शांतता रॅलीमुळे उद्या नाशिक शहरातील  शाळांना सुट्टी (Nashik School Holiday)  जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी  यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅली उद्या नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार आहे   मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.  शांतता रॅलीचा समारोप हा नाशिकमध्ये होणार त्यानंतर जाहीर सभा  देखील होणार आहे.  या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व शाळांना सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे.शाळेचा उद्याचा सुट्टीचा दिवस इतर दिवशी भरून काढला जाणार आहे.  


मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली विविध जिल्ह्यातून येऊन उद्या नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार आहे. नाशिकच्या तपोवन येथून निमानी, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय,शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सीबीएस चौक या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या सभेने रॅलीचा समारोप होणार आहे. नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्यात आले आहे.  मनोज जरांगे पाटील उद्या सभेतून नेमकं काय संबोधित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   मराठा समाज रॅलीला ताकदीने येणार आहे.


मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र : मनोज जरांगे


मनोज जरांगे यांची रॅली आज अहमदनगर जिल्ह्यात आहे.  यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले,  एक दिवस मुंबईला चक्कर मारूनच यावं लागेल.  मराठा आंदोलनात फूट पडण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहे. मानापानासाठी भुकेलेले एक दिवस टेम्पोत भरावे लागतील. छगन भुजबळ, दरेकर आणि संघटनांच्या माध्यमातून मराठा आंदोलनाविरोधात षडयंत्र केलं जातं आहे मराठा अधिकाऱ्यांच्या बढत्या तरी होऊ देत नाही. मराठा समाजाने जात वाचवायला शिकलं पाहिजे. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. 


उमेदवार पाडायचे ठरले तर सर्वांनी शंभर टक्के मतदान करा : मनोज जरांगे


मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, पण मराठा समाजाला आरक्षण दिल नाही तर मराठ्यांना राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. दरेकरांच्या घरी जी बैठक झाली त्याची डिटेल माहिती मला मिळणार आहे. आता मराठ्यांची कसोटी लागली, 29 ऑगस्टला बैठक होणार त्यात जे ठरेल त्याच्या मागे ठामपणे उभे राहा. 
त्या बैठकीत ठरलं की उमेदवार पाडायचे तर सर्वांनी शंभर टक्के मराठा समाजाने मतदान करा. आता मराठ्यांची कसोटी लागली, 29 ऑगस्टला बैठक होणार त्यात जे ठरेल त्याच्या मागे ठामपणे उभे रहा, असेही मनोज जरांगे म्हणाले. 


निवडणुकीच्यावेळी मराठा समाजाला   तीर्थक्षेत्राला नेण्याचा त्यांचा डाव : मनोज जरांगे


मनोज जरांगे म्हणाले,  राजकारण आपला उद्देश नाही, समाजाला न्याय द्यायचा आहे. उमेदवार पाहू नका समाजाला न्याय देणाऱ्याला मोठं करा. समाजासाठी लढणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहा. निवडणुकांच्या वेळी मराठा समाजाच्या एकाही व्यक्तींने तीर्थक्षेत्राला जायचं नाही. निवडणुकीच्यावेळी मराठा समाजाला   तीर्थक्षेत्राला नेण्याचा त्यांचा डाव आहे. 113 आमदार येणारच नाही त्यांचे... निवडून देण्यापेक्षा पाडा पाडी खूप सोपी आहे.आता मराठ्यांनी घरा बसून फक्त बघत बसायचं नाही. जातीचे लेकरं मोठं करण्याचे पाहा. तुम्ही बघ्याची भूमिका घेतली तर आपल्या पुढच्या पिढीचे वाटोळे होणार आहे.