नाशिक : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्यभरात शांतता रॅली (Shantata Rally) काढली आहे. आज त्यांच्या रॅलीचा नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर मनोज जरांगे नाशिकमध्ये (Nashik) पाऊल ठेवण्यापूर्वीच पोलिसांनी मोठी कारवाई केली असून समता परिषदेच्या (Samta Parishad) पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 


मराठा मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिन्नरमधील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. शिर्डी येथून नाशिककडे जाताना मनोज जरांगे यांचे सिन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच सिन्नर शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सिन्नर येथील कार्यक्रमात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. 


समता परिषदेचे पदाधिकारी नजरकैदेत


समता परिषदेचे सिन्नर तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष विशाल चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी या दोघांच्या निवासस्थानी जात पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात आणले. सिन्नर पोलीस ठाण्यात या दोघांनाही स्थानबद्ध करण्यात आले आहे. मनोज जरांगे हे सिन्नरमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांची सुटका करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा समता परिषदेकडून निषेध नोंदवण्यात येत आहे. 


भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर कडकोट बंदोबस्त


मनोज जरांगे यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवर देखील बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.


मनोज जरागेंच्या शांतता रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे


मंगळवारी 13 तारखेला सकाळी तपोवन, नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार आहे. जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. तपोवन जुना आडगाव नाका - निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल यामार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील. त्यानंतर सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होईल.  


आणखी वाचा 


Manoj Jarange : 'छगन भुजबळ पागल झालेत', मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल, शरद पवारांच्या भूमिकेवरही रोखठोक वक्तव्य!