Lok Sabha Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मराठा समाजाची भूमिका काय? याबाबत मोठी घोषणा केली. राज्यातील सर्व मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार उभा करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) मराठा अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून (Dindori Lok Sabha Constituency) इतर समाजाच्या उमेदवारांच्या पाठीशी मराठा समाजाची ताकद उभी केली जाणार आहे.


मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत आंतरवली सराटी येथे बैठक पार पडली. यात लोकसभा निवडणूक लढविण्यावर समाजबांधवांकडून एकमत झाले.पाचशेहून अधिक उमेदवार उभे केल्यास, मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रस्थापितांना होणार आहे. त्यामुळे समाजातूनच अपक्ष उमेदवार उभे केले जावेत, तसेच राखीव मतदारसंघात समाजाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी मराठा समाजाने उभे राहावे, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. 


30 मार्चपर्यंत शिक्कामोर्तब


या निर्णयानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचा उमेदवार कोण असेल? याविषयी चर्चा रंगत आहे. दरम्यान, मराठा समाजाकडून चार ते पाच नावे समोर येत असून, त्यातील एका नावावर 30 मार्चपर्यंत शिक्कामोर्तब केले जाणार आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाला जो उमेदवार जाहीर पाठिंबा देणार, त्याच्या पाठीशी मराठा समाज उभा राहणार आहे.


'या' नावांची चर्चा


नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून अपक्ष उमेदवार म्हणून करण गायकर, चंद्रकांत बनकर, डॉ. सचिन देवरे, विलास पांगारकर यांची नावे पुढे आहेत. पुढील दोन दिवसांत नाशिकसह दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत नावांवर एकमत झाल्यानंतर त्याबाबतचा अहवाल जरांगे-पाटील यांना सादर केला जाणार आहे. 


नाशिक जागेवरून रस्सीखेच


नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच असल्याचे दिसून येते. या जागेवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही दावा करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी काही दिवसांपूर्वी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपने श्रीकांत शिंदेंच्या घोषणेचा जोरदार विरोध केला. त्यातच हेमंत गोडसे (Hemant Godse) हे काल शेकडो समर्थकांसह ठाण्यात दाखल झाले. यावेळी हेमंत गोडसेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शनदेखील करण्यात आले. आता नाशिकमधून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


5 खासदारांचा पत्ता कट, आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर, कोणाकोणाला लोकसभेचं तिकीट?


ठरलं? शिवाजी आढळराव पाटलांचा 'या' दिवशी अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा दावा, शिरुरमध्ये घडामोडींना वेग