Shirur Lok Sabha Constituency: शिरुर लोकसभा मतदारसंघ : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) घोषणा होण्यापूर्वीपासूनच राज्यातील शिरुर मतदारसंघाकडे (Shirur Lok Sabha Constituency) सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) आगामी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आव्हानामुळे. अजित पवार आणि अमोल कोल्हेंच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिरुर लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची ठरली. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हेंची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. अशातच अजित पवारांनी अमोल कोल्हेंविरोधात उमेदवारांची चाचपणी सुरू केली. महायुतीत शिरुरची जागा अजित पवारांना देण्यात आली. त्यानंतर अजित पवारांनी शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळरावांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं. त्यासाठीच शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. 


आढळरावांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला असून यासंदर्भात राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते अतुल बेनके यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतुल बेनके यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या (26 मार्च) संध्याकाळी चार वाजता मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. उद्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेसाठीचे उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल, असंही अतुल बेनके म्हणाले आहेत. 


दरम्यान, अजित पवारांकडून शिवाजी आढळरावांना उमेदवारी दिल्याचं पक्षाच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आलं आहे. पण त्यासाठी शिवाजी आढळरावांना अजिदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आढळरावांच्या पक्षप्रवेशासाठी रोज नवनव्या तारखा समोर येत होत्या. अशातच आता राष्ट्रवादीच्या नेत्यानं उद्याच अजित पवारांच्या उपस्थितीत शिवाजी आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं.   


अजित पवारांचं अमोल कोल्हेंना आव्हान, शिवाजी आढळरावांना उमेदवारी, कोण-कोणावर भारी? 


आधी शिवसेनेतील आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. अशातच अनेक आमदार अजित दादांसोबत आले मात्र, काहींनी थोरल्या पवारांसोबतच राहणं पसंत केलं. त्यापैकीच एक म्हणजे, अमोल कोल्हे. त्यानंतर दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या वार पलटवार झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासूनच अजित पवारांसाठी बारामतीप्रमाणेच शिरुरची लोकसभाही प्रतिष्ठेची झाली. अशातच या वादात एन्ट्री झाली शिरुरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांची. आता पक्षप्रवेश झाल्यानंतर शिवाजी आढळरावांसाठी राष्ट्रवादीकडून शिरुर लोकसभेसाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल. 


शिवाजी आढळराव पाटील कोण?


खासदार अमोल कोल्हे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढली होती. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आमने-सामने येण्याची शक्यता आहे. शिवाजी आढळराव पाटील हे भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. ते मूळचे आंबेगाव तालुक्यातील आहेत. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. सलग तीन वेळेस त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.