नाशिक : युनियन बँक (Union Bank) मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बँकेच्या मुदत ठेवीदारांचे चांगलेच धाबे दणाणले असून आता या प्रकरणी संशयित संदीप देशमुखला (Sandip Deshmukh) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  


मनमाडच्या युनियन बँकेतील एफडी घोटाळा (FD Scam) प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. युनियन बँकेत तब्बल 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपयांचा एफडी घोटाळा असून हा प्रकार लक्षात येताच बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी विमा प्रतिनिधी संदीप देशमुख यास अटक केली आहे. 


नेमका घोटाळा काय?


युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केला.  तब्बल 1 कोटी 39 लाख 65 हजार रुपयांचा हा घोटाळा असल्याचे निष्पन्न झाले आहेत. सुभाष देशमुख या विमा प्रतिनिधीने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले. त्यानंतर स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केला. 


फसवणूक झालेल्या ग्राहकांची सुहास कांदेंनी घेतली भेट


दरम्यान, एफडी घोटाळ्यातील रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी फसवणूक झालेल्या ग्राहकांची भेट घेतली आहे. बँकेविरोधात गुन्हा दाखल करत एसआयटी कक्ष स्थापन करून चौकशी करण्याची मागणी सुहास कांदे यांनी केली आहे. 


ठेवीदारांना पैसे परत देण्याची बँकेची हमी


अपहाराची व्याप्ती पाहता बँकेने तातडीने चार जणांची चौकशी पथक नेमले असून त्यांच्या मार्फत या गैरव्यवहाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी बँकेकडून देण्यात आली आहे. बँकेमार्फत संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. आता संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


अहमदनगरलाही घोटाळा उघड


अहमदनगरच्या ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड या बँकेने 113 ठेवीदारांच्या 5 कोटी 74 लाखांच्या ठेवींची फसवणूक केली आहे. नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये सात संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. काही वर्षांपूर्वीच निर्माण झालेल्या ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेने 14.40 टक्के व्याजदर देण्याचे बॅनर लावले तसा व्याजदरही ग्राहकांना दिला. नगर शहरातील सुजाता नेवसे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेली 3 लाख 75 एवढी रक्कम चांगलं व्याज मिळेल या उद्देशाने ध्येय मल्टीस्टेट निधी बँकेत ठेवली. मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर बँकेतून पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांना काहीच मिळालं नाही. नेवसे यांच्या प्रमाणेच जिल्ह्यातील 112 जणांना या बँकेने 5 कोटी 74 लाख रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. ठेवीची मुदत पूर्ण होण्याआधीच संचालक मंडळाने पोबारा केला आहे.


आणखी वाचा  


Pune Car Accident: धनिकपुत्राच्या ब्लड रिपोर्टबाबत पोलीस आयुक्तांकडून महत्त्वाचं वक्तव्य, दोनवेळा सॅम्पल्स का घेतली?