Nashik Yeola Patangotsav नाशिक : जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या विशेष महत्व आहे. तसेच येवला शहरात गेल्या अनेक वर्षांपासून पतंग (Kite) उडविण्याची परंपरा येवल्याच्या नागरिकांनी जपली आहे. यंदाच्या पतंगोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील बाजारपेठेतून नागरिकांनी विविध प्रकारचे आकर्षक पतंग तसेच विविध प्रकारच्या पतंगांची आणि आसारीची खरेदी केल्याचे पाहायला मिळते. 


रविवारी भोगी असल्याने आजपासूनच येवला शहरात पतंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. सलग तीन दिवस येवला शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावणार आहेत. प्रशासनाने पतंग उडविण्यासाठी घातक असणारा नायलॉनच्या मांजावर बंदी घातली आहे. शहरातील बऱ्याच नागरिकांनी साध्या दोऱ्यांचे बंडल विकत घेऊन पूर्वीसारखा मांजा घरीच तयार केला आहे. पतंगोत्सवात सहभागी होण्यसाठी येवल्याचे नागरिक सज्ज झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी सकाळीच पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.


पतंगोत्सवासाठी नागरिक उत्सुक


सर्वच आबालवृद्ध पतंग उडविण्याचा आनंद लुटणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या पतंगोत्सवात ढोल-ताशाचा गजर तसेच लाऊडस्पीकरचा आवाज तसेच शहरातील सुप्रसिद्ध वाद्य हलकडीच्या तालावर नाचत येवलेकर पतंग उडविण्याचा आनंद घेणार आहेत. या सण-उत्सवानिमित्ताने शहरातील बिल्डिंग तसेच घराच्या गच्चीवर पतंग उडविण्याचा आनंद नागरिक घेणार असून, मोठ्या आनंदात तसेच अतिउत्साही वातावरणात एकमेकांचे पतंग कापण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. 


राज्याच्या विविध भागांतून नागरिक येवल्यात दाखल


तीन दिवस चालणारा हा पतंगोत्सव बघण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे नातेवाइक, मित्रमंडळी तसेच देशाच्या राज्याच्या विविध भागातून नागरिक, पाहुणे येवला शहरात दाखल झाले आहेत. शहरातील यवक, महिला, युवती, लहान मुले, तसेच वृद्ध मंडळीदेखील पतंग उडविण्याचा आनंद लुटताना दिसून येतात. येवल्याचा मकरसंक्रांतीला सलग तीन दिवस पतंग उडविण्याचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक लागतो तर भारतात दुसरा क्रमांक लागतो. 


राजकीय नेतेमंडळीही लुटतात आनंद


राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ असल्याने ते दरवर्षी येथील पतंगोत्सवाला भेट देऊन पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. तसेच मंत्री गिरीश महाजन, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार आदींसह इतर नेतेमंडळी तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी येवल्यात यापूर्वी येऊन पतंगोत्सवाचा आनंद लुटला आहे. 


फटाक्यांचीही आतिषबाजी


मकरसंक्रांतीनिमित्ताने पतंग उडविण्याचा आनंद घेत असतानाच रात्रीच्या वेळी येवला शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येते. विविध प्रकारचे आकाशदिवे आकाशात सोडण्यात येतात तर विविध आकर्षण फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येते. दीपावली सणापेक्षा अधिक प्रमाणात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी शहरातील नागरिकांकडून मकरसंक्रांतीला करण्यात येते. 


येवल्यात बनतात वेगळ्या धाटणीचे पतंग


येवल्यात पतंगबाजीबरोबर वेगळ्या धाटणीचे पतंगही तयार केले जातात.पतंग घ्यायचा तर आधींचा, पावणाचा, सव्वाचा किती 'फडकी'चा घ्यायचा, हे ठरविले जाते. फडकी म्हणजे पतंग तयार करण्याचा कागद. अर्धी फडकी म्हणजे सर्वात लहान पतंग तयार करण्यासाठी लागणार्‍या कागदाचे प्रमाण होय. 


या फडकीचं प्रमाण वाढवाल तसा त्याचा आकार वाढत जातो. डट्टा म्हणजे पतंगामध्ये वापरण्यात येणारी काडी. कमान म्हणजे पतंगाच्यामध्ये वाकवलेली काडी. हे सगळं खळीच्या सहाय्याने पतंगाला चिकटवले जाते. त्यानंतर शेपटी लावून पतंगाच्या डट्ट्याच्या दोन्ही बाजूंना दोन ठिपके काढून डोळे तयार होतात. अशा पद्धतीने हटके पतंग तयार केली जाते. 


आणखी वाचा


Weather Today : गारठा वाढणार! सर्वत्र दाट धुक्याची चादर, 'या' भागात पावसाची शक्यता