Weather Update Today : देशाच्या विविध भागातील तापमानाचा पारा आता घसरताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात देशभरात विविध ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आता देशातील हवामानात बदल होत असून गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्येही प्रचंड थंडी पाहायला मिळत आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता असून त्यानंतर थंडीच घट होण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण पंजाब तसेच बिहारमध्ये काही ठिकाणी थंडीच्या दिवसापासून तीव्र थंडी पाहायला मिळत आहे.
दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पंजाब, हरियाणा-चंदीगढ-दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि काही भागांमध्ये राजस्थान आणि बिहारच्या काही भागांमध्ये किमान तापमान 3 ते 7 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. दक्षिण राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा 8 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागात अतिशय दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील प्रवाशांनी अत्यंत सावधगिरीने आणि फक्त फॉग लाइट्ससह वाहन चालवण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. द्रुतगती मार्गांवर सकाळपर्यंत धुके कमी होईपर्यंत प्रवास टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
तापमानाचा पारा घसरला
अमृतसर, चंदीगड, पटियाला, अंबाला, गंगानगर, पालम, सफदरजंग, लखनौ येथे आज खूप दाट धुके पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. देशाच्या विविध भागात तापमानाचा पारा घसरला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि वायव्य मध्य प्रदेशच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळेल. तर, चंदीगड, दिल्ली आणि आसामच्या काही भागात विरळ धुक्याची चादर पाहायला मिळेल. आज 14 जानेवारीला हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा-चंडीगड, पूर्व राजस्थान दंव पडण्याचीही शक्यता आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज 14 जानेवारीला पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या भागात 16 जानेवारीपर्यंत पाऊस किंवा हिमवर्षाव होण्याची शक्यता कायम आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 15 जानेवारीला ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. आज तमिळमध्ये पावसाची शक्यता असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पुढील 24 तासांत केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान राहील. दक्षिण तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.