नाशिक (Nashik) : धोंड्याचा महिना (Adhik Maas) म्हटला की जावईबापूंना मोठा मान सन्मान असतो. घरोघरी जावईबापूंना बोलावंण पाठवलं जातं. त्यानंतर मुलीचा मान आणि जावयाला वाण दिले जाते. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील (Nashik) एका बांधकाम व्यावसायिकाने लेकीची आणि जावयाची काढलेली जंगी मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल सहा बैलगाड्यांच्या माध्यमातून टाळ मृंदुंगाचा गजरात हा अनोखा सोहळा पार पडला आहे. 


अधिक मास हा दर तीन वर्षांनी येत असतो. त्यावर्षी अधिक मास असल्याने त्यास धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते. याच महिन्यात जावईबापूंना मोठा मान सन्मान दिला जातो. महाराष्ट्रात याला वेगळी परंपरा असून सासरची मंडळी जावयाला घरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात धोंड्याचा महिना साजरा केला जात असून याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक असलेल्या गौतम हिरण यांनी लेकीची आणि जावयची काढलेली जंगी मिरवणूक काढत अनोखा सोहळा साजरा केला आहे. त्यामुळे परिसरात जावईबापूंच्या मिरवणुकीची जोरदार चर्चा रंगली आहे. 


एकीकडे आपल्या आई-वडिलांच्या घरातून सासरी गेलेली मुलगी जेव्हा माहेरी परतते. तेव्हा तिला गोडधोड खाऊ घातले जाते. तसेच धोंड्याच्या महिन्यात मात्र जावयाला अधिक मान दिला जातो, हाच धोंड्यांचा सण साजरा करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले गौतम कांतीलाल हिरण यांनी तो पारंपारिक पद्धतीने मराठमोळ्या थाटात साजरा केला आहे. या सोहळ्यात सजावट केलेल्या सहा बैलगाड्यातून जावई आणि मुलीची मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक, हलगी, टाळ-मृंदुगाचा गजरही यावेळी झाला. रवी शंकर मार्गावरील शुभ भाग्य या बंगल्याजवळ सकाळी 10 वाजेपासून हा कार्यक्रम सुरु होऊन परिसरातून वाजत गाजत मिरवणुकीला साज चढला. 


संस्कृती जपली पाहिजे... 


दरम्यान या अनोख्या सोहळ्यासाठी मुलगी आणि जावयासाठी मराठमोळा ड्रेस कोडही होता. जावयाने धोतर, कुर्ता आणि टोपी परिधान केले होते. मुलगीने नववारीचा शृंगार केला होता. यावेळी या दोघांचे स्वागतही वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. त्याचबरोबर रस्त्यावर रांगोळी आणि फुलांची सजवाट करण्यात आली होती. या सोहळ्यात भविष्य सांगणारा लक्षवेधी होता. तर मेंहदीचा सोहळाही येथे रंगला, या सोहळ्यासाठी हिरण कुटुंबियातील मुलगी, तीन आत्या, 13 बहिणी आणि सर्व जावई आले होते. गौतम कांतीलाला हिरण यांनी सांगितले की, आपली भारतीय संस्कृती आपण जपली पाहिजे. नवीन पिढीला ती समजावी, यासाठी थोडं वेगळ करण्याचा निर्णय घेतला. 


इतर संबंधित बातमी : 


Beed News: आला धोंड्याचा महिना... परंपरेला छेद देत बीडमध्ये जावयानं दिलं सासू-सासर्‍यांसह आईला धोंड्याचं गिफ्ट