नाशिक : आपलं मुलं नजरेआड झालं तरी आईवडिलांचा जीव कासावीस होतो, एखाद्यावेळी मुलं हरवलंच तर आईवडील हंबरडाच फोडू लागतात. असाच काहीसा प्रकार नाशिकच्या (Nashik) रेल्वेस्थानकावर घडला आहे. मात्र या घटनेत पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत काही तासांत मुलाला आईवडिलांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे काही काळ आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती, मात्र पोलिसांच्या (Nashik Railway Police) मदतीने शेवट गोड झाला आहे.
अनेकदा रेल्वेस्थानकावर मुलं हरविल्याच्या, मुलं डब्ब्यात बसून गेल्याच्या घटना घडत असतात. अशीच काहीशी घटना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर घडली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावर (Nashikroa Railway Station) एक कुटुंब रेल्वेची वाट पाहत होते. मुंबईहून जबलपूरकडे (Jabalpur) जाणारी छपरा एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकावर थोड्याच वेळात येणार होती. छपरा एक्सप्रेस आल्यानंतर आईवडिलांनी गर्दीच्या नादात डब्ब्यात चढून घेतले. मात्र मुलगा राहून गेला, तर रेल्वे निघूनही गेली. काही वेळाने दोन वर्षांचे बालक प्लॅटफार्मवर रडत असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रजनीश यादव आणि हेमंत पठारे यांच्या निदर्शनास आले. या जवानांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या प्रवाशांना या मुलाबाबत चौकशी केली, मात्र, कोणालाही या मुलाबाबत माहिती देता आली नाही. त्यामुळे पोलिसांसमोर या मुलाचे पालक कोण, ते कुठे आहेत, हे शोधण्याचे आव्हान उभे राहिले.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत सुरवातीला मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मुलाला नाव गाव विचारण्यात आले, मात्र दोन वर्षाच्या मुलाला काहीच सांगता येत नव्हते. यानंतर पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता हा मुलगा छपरा एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या त्याच्या आई-वडिलांसोबत आढळून आला. त्यावरून पोलिसांनी एक्स्प्रेसचे पेंट्रीकार अभिषेक गौर यांना संपर्क साधत त्यांना रेल्वेत तपास करायला सांगितले. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी रेल्वेत चौकशी केल्यानंतर जबलपूर येथील दीपचंद चक्रवती याने मुलगा हरवल्याचे सांगितले. त्यांना मोबाइलमधील मुलाचा फोटो दाखवला असता तो मुलगा त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले.
अन् शेवट गोड झाला....
छपरा एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून निघून ती लासलगाव रेल्वेस्थानक पार करून पुढे गेली होती. मात्र अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित आईवडिलांना मनमाडला उतरण्याचा सल्ला दिला. आईवडिलांनी मनमाडहुन पुन्हा नाशिकरोड स्टेशन गाठले. जेव्हा आईवडिलांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरक्षण तिकीट वेंटिंगवर असल्याने ते घाईघाईने रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात त्यांचे मुलाकडे दुर्लक्ष झाले आणि मुलगा खालीच राहून गेला. पोलिसांनी तत्काळ तपास केल्याने या मुलाची मातापित्यांशी पुन्हा भेट झाली आणि शेवट गोड झाला.
इतर संबंधित बातमी :