Amrit Bharat Station Scheme : बीड (Beed) जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाला असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी परळी रेल्वे स्थानकावर बीडच्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून, यामध्ये परळी रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. त्यामुळे यावेळी प्रीतम मुंडे यांनी पंतप्रधान यांचे आभार मानले. 


बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामुळे परळी रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व आहे. वैजनाथच्या दर्शनासाठी परळीमध्ये देशभरातून भाविक येत असतात. तर, दुसरीकडे परळी येथे असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रामध्ये येणारा कोळसा देखील रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून येतो. त्यामुळे, परळीच्या रेल्वे स्थानकाच सुशोभीकरण हे अमृतभारत योजनेतुन करण्यासाठी खासदार प्रीतम मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर, परळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 24 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. याच माध्यमातून रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटणार आहे. तर, याच रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा आणि सुशोभीकरणाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे.


जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचाही समावेश...


केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशभरातील स्थानकांचा विकास करण्यात येत असून, देशातील 507 तर महाराष्ट्रातील 123 स्थानकांचा यात समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (06 ऑगस्ट) रोजी नवी दिल्लीतून रेल्वे स्थानकांच्या या विकास कामांचे ऑनलाइन पद्धतीने उदघाटन करण्यात आले आहे. तर जालना रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तर औरंगाबादमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आहे. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी 359 कोटी रुपयांचे कामे केली जाणार आहे. 


रेल्वे स्थानकावर एलईडी स्क्रीनची व्यवस्था 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने दिल्लीहून सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.  विशेष म्हणजे, हा कार्यक्रम सर्वांना पाहता यावा याकरता, कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्व 123 स्थानकांवर मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Amrit Bharat Station Scheme : 'विरोधक ना काही करणार, ना करू देणार' : पंतप्रधान नरेंद्र मोदी