(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : आता नाशिककरांना तिरुपतीचेही दर्शन घेता येणार, स्पाइसजेटची ‘कनेक्टिंग’ सेवा, असे आहे वेळापत्रक
Nashik News : नाशिककरांसाठी (Nashik) महत्वाची बातमी असून आता ओझर विमानतळावरून (Ozar Airport) तिरुपतीचेही दर्शन घेता येणार आहे.
Nashik News : नाशिककरांसाठी (Nashik) महत्वाची बातमी असून आता ओझर विमानतळावरून (Ozar Airport) तिरुपतीचेही दर्शन घेता येणार आहे. त्या सोबत पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट (Connecting Flite) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
करोना काळात (Corona Crisis) बंद झालेल्या विमानसेवा पून्हा गतीमान होत असून येत्या 22 जुलैपासून नाशिक-हैदराबाद, तर 4 ऑगस्टपासून नाशिक- दिल्ली विमानसेवेला सुरवात होत आहे. ’स्पाइसजेट’कडून (Spicejet) हैद्राबाद सेवेसोबतच आता तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट उपलब्ध करून देण्यात आली असल्याने पर्यटकांसाठी नाशिक ते तिरूपती प्रवास सुखकर होणार आहे.
नाशिकहुन सध्या अलायन्स एअरद्वारे अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, नवी दिल्ली व बेळगाव या शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. ’स्पाइसजेट’कडून 22 जुलैपासून हैदराबादसाठी, 4 ऑगस्टपासून नवी दिल्लीसाठी सेवा सुरू होत आहे. नाशिक - हैदराबाद सेवेचा आयटी, उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे, तर तिरुपती व पुद्दुचेरी कनेक्टिव्हिटीचा भाविक, पर्यटकांना लाभ होणार आहे. तसेच नाशिक हैदराबाद ही सेवा दुहेरी असून, त्यामुळे दक्षिण भारतातून शिर्डी, त्र्यंबकेश्वरला भाविकांची आवक वाढण्याचीही शक्यता आहे.
असे आहे वेळापत्रक
नाशिक- हैदराबादला तिरुपती व पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. नाशिकहून सकाळी 8.10 वाजता उड्डाण घेणारे विमान 9.40 वाजता हैदराबादला पोहोचणार तर आहे. तेथून दुपारी 12.55 वाजता तिरुपतीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, ती दुपारी 2.05 वाजता तेथे पोहोचेल. तर दुपारी 11.50 वाजता पुद्दुचेरीसाठी कनेक्टिंग फ्लाइट असून, तो दुपारी 1.30 वाजता तेथे पोहोचेल. तूर्त ही सेवा एकेरी असली, तरी लवकरच ती दुहेरी सुरू होण्याची शक्यता आहे.
’स्पाइसजेट’कडून येत्या काळात आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या नाशिक हैद्राबाद सेवा शनिवार वगळता आठवड्याच्या 6 दिवस राहणार आहे. तर नाशिक दिल्ली सेवा दररोज राहणार आहे. येत्या 4 ऑगस्टपासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. नवी दिल्लीहून 11 वाजून 55 मिनिटांनी नाशिककडे विमान उड्डाण घेणार असून, दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी पुन्हा रवाना होणार आहे. ते तेथे 4 वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल. पर्यटनाला यामुळे बुस्ट मिळणार असल्याचे आयमा एव्हिएशन कमिटीचे प्रमुख मनीष रावल यांनी सांगितले.