Nashik Traffic Issue : नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याबरोबर वाढत चाललेली पार्किंगची समस्या यावर तोडगा म्हणून आता शहरात ट्रॅफिक माईल हि संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील महत्वाच्या संस्था असलेल्या पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, वाहतूक विभाग, स्मार्ट सिटी आदींचा सहभागातून हि योजना राबविण्याचा मानस आहे.
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत असून यामुळे पार्किंगचा प्रश्न उभा राहिला आहे. यापूर्वी अनेकदा पार्किंग संदर्भात उपाययोजना राबविण्यात आल्या, मात्र सगळ्या सपशेल फेल ठरल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या पुढाकाराने मनपा प्रशासन, वाहतूक विभाग, स्मार्ट सिटी यांना हाताशी धरून ही वाहतूक कोंडी फोडली जाणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न, वाहन तळाचा प्रश्न आदींवर तोडगा काढण्यासाठी जयंत नाईकनवरे यांनी संयुक्त बैठकीत ट्रॅफिक माईल हि संकल्पना मांडली आहे.
दरम्यान यापूर्वीच्या बैठकीत 'गाडी तिथे जागा, जागेवर गाडी', या संकल्पनेतून शहरातील पार्किंगची समस्या निवारण्याचा निश्चय केलेल्या पोलीस आयुक्तांनी चार प्रशासकीय यंत्रणांना एकत्र आणले आहे. वाहतूक सुरक्षेसाठी ट्रफिक माईल या संकल्पनेचे सूतोवाच आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले असून त्या अंतर्गत शहरातील बावीसशे किलोमीटर रस्त्यांचे सर्वेक्षण होणार आहे. यामध्ये रस्ता सुरक्षेसह स्मार्ट होणाऱ्या शहरातील रस्त्यांवर शंभर मीटरसह ई मॅपिंगसह यंत्रणेला कनेक्ट करण्याचे नियोजन असून त्याची अंमलबजावणी झाल्यास शहराचे चित्र खऱ्या अर्थाने पालटेल असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
विशेष बैठकीत निर्णय
या संदर्भात पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चा व सूचनांनुसार आरटीओ, महापालिका, स्मार्ट सिटीकडून निधी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती मदत पुरविण्यात येणार असल्याची पोलीस आयुक्तांनी दिली. तसेच महापालिकेनेही संकल्पनेला सकारात्मकता दर्शवली आहे. तर रस्त्याच्या नियोजनासाठी नाशिक आरटीओने पुढाकार घेतला आहे. केवळ पार्किँगच नव्हे तर संपूर्ण शहरातील वाहतुकीच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा निर्णय चारही यंत्रणांनी दर्शवला आहे.
असे असेल ट्रॅफिक माईल
शहरातील काही ठिकाणी पे अँड पार्क ठेवण्यात येणार असून कमी दरात अथवा मोफत पार्किंग असावी असा कयास बांधला आहे. शहरात बावीस किलोमीटरचे रस्ते असल्याने या रस्त्यांवर दिशादर्शक फलक, सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, सीसीटीव्ही असणे अत्यावश्यक आहेत. शहरातील महत्वाचे ठिकाण असणारे सीबीएस हे 'झिरो माइल केंद्र' असेल, तेथून प्रत्येक 100 मीटर वर निशान केले जाणार असून त्यास स्वतंत्र रंग दिला जाईल. जेणेकरून किलोमीटर आणि दोन स्थळातील अंतर प्रवाशांच्या लक्षात येण्यास मदत होईल. शहरातील सर्व रस्ते गूगल लोकेशनला जोडणार असून चारही यंत्रणा मिळून कंट्रोल रूम असेल. अँपद्वारे अथवा क्रमांकाद्वारे मदत मागितल्यास संबंधित यंत्रणेला कळवून त्वरित कारवाई कार्यवाही करण्याचा मानस आहे. त्यासाठी शंभर मीटरचे निशान उपयुक्त ठरणार आहे.
नाशिक शहरात ट्रॅफिक माईल वाहतुकीला कोंडीला फोडणार आहे. वाहतूक कोंडी फोडायची असल्यास वाहतूक सुरक्षेसह रस्ते चांगल्या दर्जाचे असायला हवे त्यासाठी काही संकल्पना मांडल्या आहेत. महापालिकेचा संबंधित यंत्रणांनी तयारी दर्शविल्यास पोलीस संपूर्ण सहकार्य करतील. यातून निश्चितच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.
- जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त नाशिक