Nashik Sugar Factory : नाशिकमधून (Nashik) शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी आली आहे. गेल्या नऊ वर्षापासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nasik Suga Factory) येथे साखर निर्मितीला सुरवात झाली आहे. अवघ्या दीड महिन्यात मशिनरी दुरुस्ती होऊन गळीत हंगाम घेण्याचा हा महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिलाच प्रयोग असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे साखर निर्मितीला प्रारंभ झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. 


नासिक साखर कारखाना म्हणजे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अगदी जवळचा प्रश्न होता. यामुळे कारखाना नऊ वर्षांपासून बंद असल्याने असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी नासिक साखर कारखाना खा. हेमंत गोडसे व दीपक चांदे यांच्या अथक प्रयत्नातून सुरु झाला. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात मशिनरीं दुरुस्तीचे काम केल्याने, चाचणी गळीत हंगाम यशस्वी झाला आहे. दरम्यान कारखान्याच्या चाचणी गळीत हंगामाचा पहिल्या पाच साखर पोत्यांचे उत्पादनही घेण्यात आले. 


नाशिक साखर कारखाना हा चार तालुक्यातील शेतकऱ्यांचे दृष्टीने अतिशय महत्वाचा असून कारखाना केव्हा सुरू होतो, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. अखेर नाशिकचे प्रसिद्ध बिल्डर असलेले दीपक चंदे यांनी करार तत्त्वावर कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसांत नासाकाची चाके फिरू लागली. अन शेतकऱ्यांची रोजगाराची वाटही सुकर झाली. यानंतर अल्पावधीतच कारखान्याच्या मशिनरींची दुरुस्ती करून प्रत्यक्षात साखर निर्मितीला प्रारंभ झाला आहे. 


आगमही काळातील नियोजन 
दरम्यान येत्या काळात म्हणजेच आगामी २०२२-२३ या गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जाणार आहे. त्यातही मशिनरींचे आधुनिकीकरण करून गाळप क्षमता प्रतिदिनी १२५० मे टन वरून २५०० मे टन करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे आगामी हंगामात दररोज ३२०० मे टन गळीत करण्यात येणार आहे. यासह 30 केएलपीडी आसवानी, इथेनॉल प्रकल्प उभा केला जात आहे. व्हिएसआय तज्ज्ञांच्या माध्यमातून जास्त साखर उतारा देणाऱ्या उसाची लागवड करण्याकडे भर राहणार असून कारखान्यांत ठीक ठिकाणी अत्याधुनिक मशिनरी लवकरच बसविली जाणार आहे. 


अशी झाली साखर निर्मिती 
नासिक साखर कारखान्याचा शेवटचा गळीत हंगाम 2012-13 साली झाला. त्यानंतर साधारण नऊ वर्ष कारखाना बंद होता. २०२२ च्या मार्च महिन्यात 30 तारखेला जिल्हा बँक व दीपक बिल्डर यांच्यात करार झाला. त्यानंतर 2 एप्रिल रोजी पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गेट उघडण्यात आले. 3 एप्रिलपासून कामकाज सुरू झाले. तर 3 मे रोजी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. 16 मे प पू शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली. 25 मे रोजी प्रत्यक्ष साखर निर्मितीला प्रारंभ झाला.