नाशिक: नोटबंदीच्या निर्णयानंतर नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी स्मार्ट होत, दंड वसूल करण्यासाठी स्वाईप मशिनचा पर्याय निवडला. पण दंडवसुलीवेळीच भररस्त्यात वाहतूक पोलिसांची फजिती झाल्याचे पाहायला मिळाले.

500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्यानं पोलिसांना दंड स्वीकारताना अनेक अडचणी येत होत्या. शंभर रुपयांच्या दंडासाठी अनेकजण 2000 च्या नोटा पुढे करत. त्यावर उपाय म्हणून नाशिक वाहतूक पोलिसांनी स्वाईप मशिनचा पर्याय निवडला. मात्र, हे मशिन वापरायचं कसं? याचं प्रशिक्षण न मिळाल्यानं भर रस्त्यात पोलिसांची मोठी फजिती होत होती. यावर मोबाईलवर बोलताना पकडलेल्या एका दुचाकी स्वारानेच पोलिसांची ही अडचण सोडवली.

सिडको परिसरात राहणारे नितीन भामरे एका महत्त्वाच्या कामानिमित्त सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले होते. मात्र मुंबई नाक्यावर येताच मोबाईलवर बोलत असल्याच्या कारणावरुन वाहतूक पोलिसांनी अडवले. सुट्टे पैसे नसल्याने कार्ड स्वाईप करण्यास सांगितले.

यानंतर भामरेंनी आपले डेबिट कार्ड पोलिसांना दिले. मात्र स्वाईप मशिन चालवायचे कसे हे माहीत नसल्याने मुंबई नाक्यावरील वाहतूक पोलिसांची चांगलीच फजिती झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास कार्ड स्वाईप होत नसल्याने अखेर भामरे हेही पोलिसांच्या मदतीस उतरले. वाहतूक पोलिसांनी शेवटी स्वाईप मशीनच्या एक्सपर्टला फोन लावला त्यानंतर 15 ते 20 मिनीटानंतर यामध्ये एक्सपर्ट असणारे महाशय आले आणि भामरे यांचे कार्ड स्वाईप झाले.