Amit Thackarey On Samruddhi Toll Plaza : 'साहेबांमुळे 65 टोलनाके बंद पडले आता माझामुळे त्यात एकाची भर पडली आहे', असं म्हणत अमित ठाकरे (Amit Thackarey) यांनी समृद्धी महामर्गावरील (Samruddhi Highway) टोलनाका प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्गावरील नाशिक-सिन्नरजवळील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे राग अनावर झाल्याने मनसे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली. रात्री शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन नाशिककडे परत जात असताना अमित ठाकरे यांना समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आलं.
मी तिथून गेल्यानंतर टोलनाक्यावर तोडफोड झाली : अमित ठाकरे
रात्री साईबाबांचा दर्शन घेतल्यानंतर मला नाशिकला काम असल्याने मी नाशिककडे निघालो. सिक्युरिटी दिवसभर बरोबर असल्याने त्यांना शिर्डीचा थांबायला सांगितलं. कोपरगावहून समृद्धी महामार्गावरुन नाशिककडे निघालो आणि सिन्नरजवळ असलेल्या एक्झिटला माझी गाडी थांबवली. गाडीला फास्टॅग असतानाही तो रॉड खाली आला. तो टोलनाक्याचा काहीतरी टेक्निकली प्रॉब्लेम होता. माझ्या सहकाऱ्याने ने त्यांना फास्टॅगबाबत विचारलं तर त्यांनी आमचे काही इश्यूज आहेत असं आम्हाला सांगितलं. टोलनाक्यावरील कर्मचारी सुद्धा अत्यंत उद्धट होते. तर मॅनेजरला त्यांनी फोन केला तेव्हा तो सुद्धा तशाच भाषेत बोलत असल्याचं दिसलं. दहा मिनिटे थांबवल्यावर मला त्या ठिकाणाहून सोडण्यात आलं आणि मी नाशिकला हॉटेलवर पोहोचलो तेव्हा कळलं की टोलनाका फोडण्यात आला आहे. साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आज अजून एक अॅड झाला, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी स्मितहास्य करत दिली आहे.
अजूनही कोणतीही कायदेशीर कारवाई नाही
दरम्यान याबाबत पोलिसांनी माहिती देताना म्हटलं की, "अमित ठाकरे याचा फास्टटॅग ब्लॅकलिस्टेड झाला होता. पण टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अमित ठाकरेंची गाडी असल्याचं लक्षात आलं नाही. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते टोलनाक्यावर जमले. पण पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. आम्ही कार्यकर्त्यांना प्रकार नीट समजावून सांगितलं. त्यांनतर कार्यकर्ते कोणताही गोंधळ न घालता तिथून निघाले. टोलनाक्याच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. आम्ही इथे त्यानंतर दोन तास होतो. पण अचानक रात्री अचानक वाजता काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा टोलनाक्यावर आलो. पण सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. कोणत्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई करु."
समृद्धी महामार्गावर नक्की काय घडलं ?
अमित ठाकरे ज्या गाडीमध्ये बसले होते त्या गाडीची नोंद मनसे पक्षाच्या नावाने आहे. समृद्धी महामार्गावर रात्री 9.21 वाजता गोंदे फाट्यावरील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांच्या गाडीचा फास्टॅग हा ब्लॅकलिस्ट असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण गाडीमध्ये अमित ठाकरे आहेत हे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं नाही. पण जसं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी त्यांच्या ताफ्याला सूट देऊन ताफा सोडला. मात्र रात्री अडीच वाजेच्या सुमारास संतप्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. सध्या पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी टोलनाक्यावर दाखल झाले आहेत. पण अजून कोणतीही कायदेशीर तक्रार टोल प्रशासनाकडून पोलिसांकडे प्राप्त झालेली नाही.