Nashik Leopard : मागील काही दिवसांपासून नाशिकरोड (Nashik) परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत कायम आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे बिबटयाने नाशिकरोड येथील आनंदनगर भागात नागरिकांना दर्शन दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. अशातच रविवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास आनंदनगर येथील कदम लॉन्सजवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली.
गेला महिनाभरापासून नाशिकरोड परिसरातील गुलमोहर कॉलनी आनंदनगर भागात बिबट्याचा मुक्त वावर (Leopard) असून मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्लात एकजण थोडक्यात बचावला होता. नाशिकरोड परिसरात बिबट्याच्या संचारामुळे भीतीचे वातावरण असतानाच येथील आनंदनगर भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजता यांच्यावर हल्ला चढवला. बिबट्याने झेप घेत शेख यांच्यावर झडप (Leopard Attack) घातली. या हल्ल्यात शेख यांच्या डोक्याला जबर जखम झाली त्यांना खाजगी रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेख हे भालेकर मळा येथील रहिवासी असून गुरुदेव गॅस एजन्सी मध्ये कामाला आहे. रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास राजू शेख रस्त्याने पायी जात असताना बिबट्याने प्रचंड वेगाने त्याच्यावर अचानक हल्ला केला.
नाशिकरोड परिसरातील आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. यावेळी या रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरडा केल्याने येथे गर्दी जमली. स्थानिकांनी तात्काळ शेख यांना रुग्णालयात दाखल केले. याबाबतची माहिती कळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. येथील गुलमोहर कॉलनीतील एका बंगल्यात बिबट्या शिरल्याचा कयास असल्याने या बंगल्याजवळ मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक जमा झाले होते. सध्या वनकर्मचाऱ्यांकडून बिबट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
नाशिकरोड परिसरात मुक्त संचार
जय भवानी रोडवरील आडके नगर भागात पहाटे पाच वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्यानंतर पुन्हा रविवारी बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आर्टिलरी सेंटर रोडवरील गुलमोहर कॉलनीत रविवारी पहाटे बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामधून एक महिला देखील बचावली होती. त्यातच रविवारी पहाटे डॉ. कनोजिया यांच्या बंगल्याचे आवारातील एका क्षणावर बिबट्याने हल्ला केल्याचे समोर आले. रविवारी झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. वन विभागाने तातडीने याची दखल घेऊन पिंजरा लावावा तसेच बिबट्याला रेस्क्यू करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येते.
इतर महत्वाच्या बातम्या :