Jalgaon News : मधमाशी (Honey Bee) म्हटलं की मधाचं पोळं आठवतं, मध आठवतो, मात्र त्यानंतर मधमाशांनी लावलेला डंखही आठवतो. मग मधमाशीच्या नादाला लागणेच चुकीचं असल्याचे समजून आपण अनेकदा मधमाशीला डिवचत नाही. मात्र जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात विचित्र घटना समोर आले आहे. मधमाशीने चावा घेतल्याने तरुण शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली आहे.
जळगावच्या जामनेर तालुक्यात (Jamner) ही घटना घडली आहे. तरुण शेतकरी घरी जात असताना अचानक रस्त्यात मधमाशीने डंख मारला. एवढ्यावर न थांबता ही मधमाशी तोंडावाटे घशात गेली. त्यामुळे या तरुणास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. दरम्यान प्राथमिक उपचार मिळेपर्यंत या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण असे या मृत (Death) शेतकऱ्याचे नाव आहे. मधमाशीने जिभेला चावा घेऊन घशात डंख मारला. यामुळे श्वास घेणे असह्य झाल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील लोंढी बुद्रूक येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमजदखॉं पठाण (Amjad Kha Pathan) यांचे गावातील शेंगोळे रस्त्यावर शेत आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता ते मजुरांसाठी जेवणाचे डबे घेऊन दुचाकीने शेतात गेले होते. त्यानंतर घराकडे निघाले होते. शेताच्या बाजूलाच मधमाशीचे पोळ होते. मात्र पठाण हे नेहमीप्रमाणे घरी चालले होते. मात्र याच पोळातील एका मधमाशीने पठाण यांचा घात केला. ते रस्त्याने चालले असताना अचानक एक मधमाशी त्यांच्या जिभेला चावा घेऊन घशात गेली. यामुळे पठाण यांना असह्य वेदना होण्यास सुरुवात झाली. मधमाशी घशात गेल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक उपचार मिळेपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता.
अमजदखॉं पठाण यांच्या पश्चात आई, वडील, दोन मुले, मुली व भाऊ असा परिवार आहे. लोंढी गावात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जावई होत. डंख करणारी मधमाशी आग्या मोहाळामधील असावी. मधमाशीने घशात डंख मारल्यावर तिथे सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मधमाशीचा डंख विषारी असल्याने शरीरातील अवयव निकामी होऊन रक्तचाप कमी होतो. यामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांनी शेतात जातांना चेहरा, तोंड, नाक रुमालाने झाकून घ्यावे आणि स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.