Nashik Honey Bee Park : नाशिकचं (Nashik) फ्लॉवर पार्क (flower Park) माहितीच असेल? या ठिकाणी हजारो प्रकारच्या फुलांचा गंध नाशिककर नाहीतर राज्यातील हजारो पर्यटकांना मोहित करतो. याच नाशिकमध्ये आता मधमाशांचं गाव (Honey Bee Park) वसलं आहे. नाशिक जिल्ह्यातील कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) शहराजवळ दोन एकरांवर हनी बी पार्क उभारण्यात आलं आहे. शिवाय देशातील पहिले एपिटुरिसम सेंटर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 


मधमाशा म्हटलं कि गोड मध डोळ्यासमोर येत. मात्र दुसरीकडे मधाबरोबर येणाऱ्या मधमाशा देखील सोबत येतात. मात्र अलीकडच्या काळात मधमाशांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. नाशिक जिल्ह्यात देखील मधमाश्यांच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण प्रयोग राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहराजवळ मुखेड रोड परिसरात भारतातील पहिल्या बसवंत मधमाशी उद्यानाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर या पर्सिअरात अलीकडेच बसवंत कृषी उद्योग पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. मानवीजीवनातील मधमाशीचे महत्व सर्वांपर्यंत पोहचवून मधमाशीचे संरक्षण व संवर्धन व्हावे व मधमाशी प्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी हा यामागील उदेश असल्याचे पर्यटन केंद्र संचालकांनी सांगितले. 


द्राक्ष पंढरी नावाजलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात हे पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक, शहरी व ग्रामीण समाज आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. ‘ग्रीनझोन अ‍ॅग्रोकेम प्रा.लि.’ या कंपनीतर्फे मुखेड रोड, पिंपळगाव (बसवंत), जि. नाशिक येथे देशातील पहिल्या आणि नावीन्यपूर्ण अशा हनी बी पार्कची स्थापना मागिल तीन वर्षांपूर्वी करण्यात आली असून, येथे वर्षभर पर्यटन महोत्सव, राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवाद, हनिबी फेस्टिवल तसेच इतरही अनेक उपक्रम राबविले जातात. मधमाश्यांद्वारे परागीभवनातून होणारी उत्पादन वाढ लक्षात घेता बसवंत हनी बी पार्कमध्ये शेतकरी, विद्यार्थी तसेच बेरोजगार युवकांसाठी सर्व सुविधायुक्त बसवंत मधमाशी  प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून अनेक युवकांना प्रशिक्षित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतीपूरक तसेच पर्यावरणस्नेही अशा या प्रकल्पाला हजारो पर्यटकांनी भेटी दिल्या असून दिवसेंदिवस  प्रतिसाद वाढत आहे. 


‘बसवंत हनी बी पार्क’ला अवार्ड 
‘बसवंत हनी बी पार्क’ला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल सेंटर फॉर रिस्पॉनसीबल टुरिसम या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'रिस्पॉनसीबल टुरिझम अ‍ॅर्वार्ड’  मिळाला आहे. ‘नैसर्गिक वारसा आणि जैवविविधता संवर्धन करण्यासाठी पर्यटनाचे योगदान या श्रेणीमध्ये बसवंत हनी बी पार्कला रौप्यपदकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील 19 संस्थांनी सहभाग नोंदविला. सप्टेंबर महिन्यात भोपाळ येथे झालेल्या कार्यक्रमात वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केटचे अ‍ॅडव्हायजर  हॅरॉल्ड गुडवीन व मध्य प्रदेशचे पर्यटनमंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते ग्रीनझोन अ‍ॅगोकेमचे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


अस आहे बसवंत मधमाशी उद्यान
दोन एकरांवर उभारलेले बसवंत मधमाशी उद्यान  म्हणजे देश्यातील पाहिले एपिटुरिसम सेंटर. विविध संकल्पनेतून मधमाशीचे मानवी आहार, आरोग्यामधील योगदानाबरोबरच पिकांचे उत्पादन वाढ तसेच स्वयंरोजगार निर्मितीतून शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना बसवंत मधमाशी उद्यानात साकारली आहे. यामध्ये मधमाशीविषयी माहितीपट, मधमाशीचा जीवनक्रम, मधमाशांच्या वसाहतीला भेट, मधमाशांच्या गावाची प्रतिकृती - मधमाशीचे गाव, मधमाश्यांच्या शहराची प्रतिकृती, डोरसेटा पॉईंट आग्या मधमाशी प्रतिकृती, मधमाश्यांचे पेंटिंग झोन (बांबू, स्टोन, पेपर पेंटिंग), कला वस्तूंचे संग्रहालय, वाचनालय, विसावा, प्ले एरिया, बसवंत कॅफे, फूड कोर्ट, मधुबन, सेल्फी पॉईंट, मधमाशीविषयी लघुपट. 


असा आहे तिकीटदर 
दरम्यान बसवंत हनी बी पार्क गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असून या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तिकिटांद्वारे उद्यानाची माहिती मिळते. यासाठी उद्यान व्यवस्थापनाने नोव्हेंबरपासून नव्याने दर निश्चित केले आहेत. फक्त प्रवेशासाठी 100 रुपये. 5 ते 12 वर्ष मुलांना फक्त प्रवेश 50 रुपये, यात गेम झोनला एंट्री नसेल. गेम झोन मधे प्रवेश करण्यासाठी 200 रुपयांचे तिकीट 5 वर्ष वयापासून सर्वाना लागू असेल. त्यांनतर दोन्ही प्रोजेक्ट ची गायडेड टूरसह सर्व गेम झोन, फॅक्टरी विज़िट, मधमाशी उद्यान ते बसवंत गार्डनला टुकटुक वॅनमधून प्रवास असेल. शिवाय वेलकम ड्रिंक आणि ४ वा चहा असेल, हे सर्व 600 रुपये  रुपयांच्या पॅकेजमध्ये मिळणार आहे. तर 5 ते 12 वर्षापर्यंत मुलांना 400 रुपये तिकीट असेल. दोन्ही तिकीटांना (600 आणि 400) 100 रुपये किमतीचे 2 कूपण देण्यात येतील. या कूपनच्या माध्यमातून मधुबन फूड कोर्ट, बसवंत कैफ़े, सोव्हेनियर शॉप आणि सिटी सेंटर मॉल येथील बसवंत आउटलेट येथे खरेदी करता येणार आहे.