Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने अॅपल कंपनीच्या (Apple Company) लॅपटॉपमधील (laptop) डेटा पुरेसा सुरक्षित नसल्याची त्रुटी शोधून काढली आणि ती कंपनीला अगदी डेमोसह सिद्धही करून दाखवली आहे. अॅपल कंपनीने या विद्यार्थ्यांचे आभार मनात त्याला अकरा लाखांचे बक्षीसही देण्यात आले आहे. 


तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्या टॅलेंटच्या जोरावर तुम्ही कुठलंही यश खेचून आणू शकता. याचं उत्तम उदाहरण हा विद्यार्थी ठरला आहे. मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर या गावातील राहणारा आहे. ओम (Om Kothavade) हा खापर येथील रहिवासी आश्रमशाळा पेचरीदेवचे मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावदे यांचा मुलगा आहे. तो पुण्यात शिक्षण घेत आहे. ओमने सांगितले की, आपल्या क्षेत्रात काहीतरी नवीन करायचे म्हणून तो नेहमी काही ना काही करत असायचा. अनेक वेबसाईटसवर (Website Bug) जाऊन त्यातील चुका शोधून काढणे, किंवा नवी माहिती गोळा करणे हा जणू छंद जडला होता. दरम्यानच्या काळात तो बराच वेळ अॅपलमधील चुका शोधण्याचा प्रयत्न करत होता. अखेरीस त्याला अॅपलच्या एका साईटवर मोठी चूक आढळली. 


ॲपल कंपनीच्या लॅपटॉपमधील डेटा चोरीला जाण्याची भीती ओमला जाणवली. त्या अनुषंगाने त्याने शोध सुरू केला. चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंद दरम्यान लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले. त्यावर उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला. ॲपल कंपनीच्या निदर्शनास ती त्रुटी आली. त्यांनी तत्काळ तसे करून बघितल्यास खरंच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांना निर्माण झाली. ओमने केलेल्या कार्याचे ॲपलने कौतुक करत आभार मानले आहेत.


दरम्यान ही गोष्ट अॅपलने मान्य केली असून ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. ॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाय करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे. तुम्हाला 13.5 हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत आभार मानले आहेत. 13 हजार 500 डॉलर म्हणजेच जवळपास 11 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. या अभिमानास्पद कामगिरीबद्दल ओमवर कौतुकाचा वर्षांव होतो आहे. 


सुधीर तांबेकडून कौतुक 


नंदुरबारच्या खापर (अक्कलकुवा) येथील ओम कोठावदे या विद्यार्थ्याने अॅपल कंपनीच्या लॅपटॉपमधील डेटा पुरेसा सुरक्षित नसल्याची त्रुटी शोधून काढली आणि ती कंपनीला अगदी डेमोसह सिद्धही करून दाखवलीय. तसेच डेटा चोरीला जाऊ नये, यासाठी काही उपाययोजनाही सुचविल्या आहेत. ही गोष्ट अॅपलने मान्य केली असून ओमच्या सूचनाही स्वीकारल्या आहेत. तसेच त्याचे आभार मानत त्याला कंपनीकडून 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ओम, या अभिमानास्पद कामगिरीबद्दल तुझे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! अशा आशयाचे ट्वीट सुधीर तांबे यांनी केले आहे.