Nashik News : तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी गंगापूर नाका (Gangapur Naka) परिसरातील अपार्टमेंटमध्ये चिमुकलीच्या अंगावर पाणी सांडल्याने अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली होती. चांदवड शहरात (Chandwad) अशीच एक घटना समोर आली आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड शहरात दुर्दैवी घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात पडून मृत्यू (Death) झाला आहे. हार्दिक गणेश पारवे (Hardik Parve) असे या मुलाचे नाव आहे. चांदवड शहरातील रोहिदासनगरमध्ये राहणारा हार्दिक पारवे हा घराच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास खेळत होता. येथील जुन्या पोलिस चाळीच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या हौदात तो पडला. परंतु कोणाच्याही हे लक्षात आले नाही. हार्दिक कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठेही सापडला नाही. रात्री आठच्या सुमारास  पाण्याच्या हौदात पाहिले, असता हार्दिक पाण्यात आढळला. त्याला येथील चांदवड उपजिल्हा रुग्णालयात (Chandwad Hospital) नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 


चांदवड शहरातील रोहिदासनगरमध्ये पारवे कुटुंब वास्तव्यास आहे. चार वर्षाचा हार्दिक सायंकाळी घराजवळ खेळत होता. घरातील कुटुंब आपल्या कामात व्यस्त होते. अशातच बराच वेळ झाला, घरच्यांना हार्दिक आढळून आला नाही. शिवाय अंधारही पडू लागला होता. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र तास-दीड तास होऊनही हार्दिक आढळून आला नाही. शेवटी मागील बाजूसं असलेल्या हौदात बॅटरीच्या साहाय्याने पहिले असता हार्दिक हौदात असल्याचं दिसलं. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.  


मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या!


एकीकडे धकाधकीच्या जीवनात मुलांकडे लक्ष देणे कमी झाले आहे. अशातच अशा प्रकारच्या अनुचित घटनांना पालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालकांनी घर ऑफिस सांभाळून मुलांकडे देखील लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा वस्तू गिळल्याने, अंगावर पाणी पडल्याने, हौदात पडल्याने, स्विमिंग पूल मध्ये पडून बालकांच्या मृत्यूच्या घटना सावर आल्या आहेत. यामध्ये पालकवर्ग आसपास असताना देखील अशा अनुचित घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून मुलांची काळजी घेणं महत्वाचे आहे.