Nashik Accident : काही दिवसांपूर्वी शेतावर ट्रॅक्टरवर (Tractor) काम करत असताना ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच आज देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरात शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना ट्रॅक्टर उलटल्याने तरुण शेतकऱ्याचा (Farmer) जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. 


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अक्षय्यतृतीया मोठ्या उत्साहात (Akshayya Trutiya) साजरी करण्यात आली. मात्र याच दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात अनुचित प्रकार घडल्याचे समोर आलं. यातलीच एक घटना देवळा (Deola) तालुक्यात घडली आहे. अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री 9 वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश (Rakesh Dhondge) हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात होता. खामखेडा (Khamkheda) गावातील शेवाळे वस्तीजवळ जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरखाली राकेश सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत राकेशला बाहेर काढले. तसेच तात्काळ देवळा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत राकेशचा मृत्यू झाला होता. कुटुंबियांना राकेशच्या निधनाच्या बातमी कळताच धोंडगे कुटुंबीय धावत रुग्णालय गाठले. मात्र राकेशच्या जाण्याची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने धोंडगे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. त्यातच राकेशच्या महिनाभरापूर्वी कुटुंबीयांनी थाटात लग्न लावून दिले होते. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. सुखाचा संसार फुलण्यापूर्वीच अघटित घडलं होत. 


महिनाभरापूर्वीच झाले लग्‍न


दरम्यान धोंडगे कुटुंबियात अनेक वर्षानंतर विवाह सोहळा पार पडला होता. राकेशचे लग्न जमल्याने काही दिवसांपूर्वीच त्याचा थाटामाटात विवाह सोहळा पार पडला होता. संसाराला सुरवात झाली असताना नियतीने घात केला अन्‌ राकेशचा अपघाती मृत्‍यू झाला. त्याच्‍या मृत्‍यूमुळे सर्व गावात हळहळ व्यक्त होत आहे.


आठ दिवसांपूर्वी नाशिकची घटना 


दरम्यान आठ दिवसांपूर्वी हिरामण ढवळ रोकडे हे शेतकरी त्यांच्या शेतावर ट्रॅक्टरवर काम करत असताना त्यांचा ट्रॅक्टर बंद पडला. ट्रॅक्टर बंद पडल्याचे पाहून   ते खाली उतरुन बंद टॅक्टरला पंप मारित असतांना अचानक ट्रॅक्टर चालू झाला. खाली बसलेल्या रोकडे यांच्यावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.  त्यांना तात्काळ उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे नेले होते. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्या पुढील उपचारासाठी गुरूजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र  उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.