Jalgaon Kishor Patil : माझे काका दिवंगत नेते आर ओ पाटील (R O Patil) यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आले देखील नाही. संजय राऊतांमुळे खर उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली आहे. ही माझ्या दिवंगत काकांसाठी सभा आहे. त्यामुळे कुठलंही गालबोट लागणार नाही. तसेच ही सभा शांततेत पार पाडावी, याची जबाबदारी मी घेत असून आमचे नेते गुलाबराव पाटील यांनाही विनंती करणार असल्याचे पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटले आहे.
आज जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. यासाठी दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) पाचोऱ्यात तळ ठोकून आहेत. अशातच पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी संजय राऊतांसह आयोजक आणि चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryavanshi) यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, माझी बहिण वैशाली दहा वेळा मातोश्रीवर गेली होती. पण तिला उद्धव ठाकरे भेटले नव्हते, माझे काका दिवंगत नेते आर ओ पाटील यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे आले देखील नाही. संजय राऊतांमुळे खरंतर उद्धव ठाकरेंची ही अवस्था झाली असल्याचे पाटील म्हणाले.
आमदार किशोर पाटील म्हणाले की, आजची सभा ही माझे राजकीय गुरु, माझे राजकीय पिता, माजी आमदार आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाची आहे. त्याच्यामुळे सभेकडे आनंदाने बघतो आहे. निर्मल सीड्स म्हणून ज्या कंपनीचे काका मालक होते, एमडी होते त्या कंपनीचे संचालक आणि कंपनी या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. त्यामुळे या सभेकडे राजकीय म्हणून पाहत नाही. तसेच ही सभा पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे आणि म्हणून मी त्या सभेसाठी येणाऱ्या सगळ्या लोकांचे स्वागत करतो. मात्र सभेला जाणार नाही, आता पुतळ्याच्या लोकार्पणाची सभा आहे. अशा गोड कार्यक्रमात जर कुठे गालबोट लागलं तर? कारण शेवटी मी एकटा जाणार नाही. माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते असणार आणि शेवटी कार्यकर्ता कार्यकर्ता असतो. सध्या संजय राऊत यांच्याकडून एखादं बेताल वक्तव्य झालं आणि तिथे एखादा कार्यकर्ता असला तर सभेची वाट लागणार. त्याच्यामुळे आज न जाता माझ्यासह तात्यांवर प्रेम करणाऱ्या हजारो शिवसैनिक उद्या 24 तारखेला दहा वाजता पुतळ्याचे पूजन करुन आम्ही भूमिका स्पष्ट करणार असल्याचे किशोर पाटील म्हणाले.
संजय राऊतांच्या बेताल वक्तव्यामुळे...
आज उद्धव ठाकरे यांच्या सभेला जाणार नाही. उद्या आर ओ तात्या पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. तिथून आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने राजकीय प्रवासाला सुरुवात करणार आहोत. राऊत यांना सल्ला असेल की तुमच्या बेताल वक्तव्यांमुळे महाराष्ट्र आज अस्वस्थ झाला आहे. राऊत यांना जर का खरंच उद्धव ठाकरे यांचा कळवळा असेल ना तर अशी बेताल वक्तव्ये करु नयेत. मात्र कधी कधी शंका येते की राऊत यांनीच तर उद्धव ठाकरे यांना संपवायची सुपारी घेतली तर नसेल ना? असा खळबळजनक सवाल यावेळी किशोर पाटील यांनी उपस्थित केला.