Nashik News : सिन्नरच्या (Sinnar) कृषी अधिकाऱ्यास लाच घेताना ताब्यात घेतल्याची घटना ताजी असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मावळत्या मुख्याधिकाऱ्याविरोधात कडक कारवाई केली आहे. रो हाऊस बांधण्याच्या परवानगीसाठी गेले सहा महिने चकरा मारुनही अडवणूक केली जात होती. आराखडा मंजूर करण्यासाठी लाच मागितली जात होती. सिन्नर शहरात सलग दुसऱ्या दिवशी लाचखोरांविरोधात (ACB Crime) कारवाई झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. 


नाशिक (Nashik) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) धडक कारवाईची मोहीम सुरु आहे. कोतवालापासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण आतपर्यंत लाचलुचपतच्या गळाला लागले आहेत. अशातच सिन्नर शहरात दोन दिवसात दोन कारवाया झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरता उद्योजकाकडून तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सिन्नर तालुका कृषी अधिकारी व निफाड (Niphad Taluka) तालुक्याचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या अण्णासाहेब हेमंत गागरे याला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. अशातच आज सिन्नर नगरपरिषदेच्या माजी मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना एबीसीने अटक केली आहे. 


एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर नगरपालिकेचा लाचखोर मुख्याधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला आहे. संजय महादेव केदार मुख्याधिकारी सिन्नर नगरपरिषद असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका नागरिकाने सिन्नर नगरपालिकेत रो हाऊस बांधकाम परवानगीचा प्रस्ताव सादर केला होता. एकूण 5 रो हाऊसचे बांधकाम करायचे होते. त्यासाठी एका रो हाऊसचे 1 हजार याप्रमाणे पाच रो हाऊसचे एकूण 5 हजार रुपयांची लाच केदार याने मागितली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला आणि त्यात लाचखोर केदार रंगेहाथ सापडला. याप्रकरणी लाचखोर केदारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी सिन्नर (Sinner) शहरात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई  झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे.


सहा महिन्यापासून चकरा, पण... 


दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून तक्रारदार हे मुख्यालयात मंजुरीसाठी चकरा मारत होते. मात्र त्यांचे काम होत नव्हते. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून घर बांधण्याचा आराखडा मंजुरीसाठी नगरपालिकेत सादर करण्यात आला होता. त्याला दोन आठवड्यात मंजुरी अपेक्षित होती. मात्र तसे झाले नाही. याबाबत मुख्याधिकारी केदार हे जाणीवपूर्वक अनेक महिन्यांपासून टाळाटाळ करत होते. तक्रारदारांना चकरा मारायला लावत होते. अखेरीस त्यांनी लाचेची मागणी केली. त्यात तडजोडीत पाच हजाराची लाच देण्याचे ठरले. ही लाच देताना एसीबीच्या पथकाने त्यांना पकडले.