Nashik News : पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापही नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई (Water Crisis) आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ आदी आदिवासी भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आजही असून यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. असाच एक प्रकार पेठ तालुक्यातील समोर आला आहे. 


पेठ तालुक्यातील (Peth) कुंभाळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीची बारी या ठिकाणी पाणी काढताना एक महिला तोल जाऊन विहिरीत पडली. सुदैवाने सोबत असणाऱ्या महिलांनी ग्रामस्थांना बोलावून घेत सदर महिलेला बाहेर काढत तिचे प्राण वाचविले. भाग्यश्री  डेव्हिड भोये असे या महिलेचे नाव आहे. भोये या नेहमीप्रमाणे शेजारील महिलांसोबत पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. यावेळी विहीर खोल गेल्याने त्या उभ्या राहून पाणी काढताना त्यांचा तोल गेल्याने त्या विहिरीत कोसळल्या. 


यावेळी सोबत असणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान राखत जवळपासच्या ग्रामस्थांना हाक दिली. यावेळी काही शेतकऱ्यांनी धावत येत महिलेला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. दैव बलवत्तर आणि स्थानिकांनी धावपळ करत या महिलेला सुखरुप विहिरीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे पेठ तालुक्यातही भीषण पाणीटंचाई आहे. बोरीची बारी हा कुंभाळे अंतर्गत येणारा पाचशेहून अधिक लोकसंख्या असलेला पाडा आहे. या गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात दोन तीन दिवसातून एकदा पाण्याचा टँकर येतो. मात्र एक ड्रमपेक्षा जास्त पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागतेय. 


दरम्यान बोरीच्या बारीच्या महिलांना कुंभाळे ग्रामपंचायत हद्दीत पाण्यासाठी यावे लागते. पाण्याच्या शोधात ही महिला एका खासगी विहिरीवर पोहोचली. मात्र पाणी भरताना तोल जाऊन ती विहिरीत कोसळली. महिलेने आरडाओरडात करताच स्थानिकांनी धावाधाव केली आणि तिला सुखरुप बाहेर काढलं. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिकमधील ग्रामस्थांचा पाण्याचा संघर्ष कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतोय. हनुमान चालिसा पठण ते राज्यसभा निवडणुकांमध्ये व्यस्त असलेल्या नेतेमंडळींना पाणीप्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय.


आदिवासी तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य 
मार्च महिना सुरु झाल्यापासून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आदी आदिवासी तालुक्यात भीषण पाणीटंचाई सुरु आहे. अनेक माध्यमांनी देखील हे पाण्याचे दुर्भिक्ष्य लोकप्रतिनिधींपुढे आणले आहे. यावर काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या. तर अनेकजण तर आजही पाण्याच्या, टँकरच्या प्रतीक्षेत असल्याचे सद्यस्थितीवरून दिसते. वर्षानुवर्षे अशा पद्धतीने उन्हाळी महिन्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्य पाहायला मिळते आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जरा निवडणुका, हनुमान चालीसा आदी प्रश्नांना बाजूला ठेवून नागरिकांच्या जीवनातील महत्वाची गरज असलेल्या पाणी प्रश्नाकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे.