नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेल्या आदिवासी पाड्यावरील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण काही केल्या थांबत नाही. विहिरीत उतरुन पाणी भरण्याच्या यादीत आणखी एका गावाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर विहिरीत खाली 30 ते 35 फूट खाली उतरुनही गाळमिश्रित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एक जण विहिरीत उतरतो आणि दोर लावून सोडलेल्या प्लस्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरुन देतो, सकाळ संध्याकाळ पाण्यासाठीचा हा जीवघेणा संघर्ष सुरु आहे. लेकरा बाळांसह हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची पायपीट सुरु आहे.


नाशिक जिल्ह्याला हे दृश्य नवीन नाही, मात्र वर्षोनुवर्षे असेच पाणी भरत असूनही सुधारणा होत नसल्याने सरकारी अनास्था, उदासिनतेविषयी संताप व्यक्त होत आहे. मान्सून वेळेत दाखल होईल या हवामान खात्याच्या अंदाजने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पावसाच्या सरींऐवजी उन्हाची दाहकताच सोसावी लागत आहे. जलस्त्रोत आटत चाललं असल्याने घशाची तहान कशी भागवावी, हा प्रश्न पडला असून गुरढोरही पिणार नाहीत असं पाणी ग्रामस्थांनी प्यावं लागत आहे.


'धरण उशाला आणि कोरड घशाला'
इगतपुरी तालुका हा नाशिक जिल्ह्याची तहान भागवण्यास मदत करतो. धरणाचं माहेरघर म्हणूनही हा तालुका ओळखला जातो. मात्र, आज याच इगतपुरीतील काही गावांची, पाड्यांची अवस्था 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी झाली आहे. इथल्या महिला, लहान मुलं पाण्याच्या शोधात दिवसभर इतरत्र वणवण करताना दिसतात. त्यातही कधी गढूळ तर कधी दुर्गंधीयुक्त पाणीच नशिबाला येतं. या पाड्यांच्या अवस्थेची कल्पना स्थानिक प्रशासनाला चांगलीच आहे, मात्र तरी देखील हे चित्र बदलण्यासाठी काहीच प्रयत्न होताना दिसून येत नाही.


आदित्य ठाकरेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण होणार? 
दरम्यान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी नाशिकमधल्या मेटघर किल्ला या दुर्गम आदिवासी पाड्यावर भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासमोर इथल्या महिलांनी कैफियत मांडली. अधिकारी येत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, विहिरी तळ गाठत आहेत, त्यामुळे जगण्यासाठी पाणी आणावं तरी कुठून असा सवाल त्यांनी विचारला. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर गावात कायमस्वरुपी पाण्यासाठी साठवण तळे बांधण्याचे आश्वासन देत अधिकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. तर काही ठिकाणी बसवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचाही शुभारंभ त्यांनी केला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर प्रशासन या पाड्यांकडे लक्ष देतील आणि नागरिकांची पाण्यासाठीची वणवण संपेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 


संबंधित बातम्या