Nashik Cyber Police : राज्यातील विविध शहरात सुरु असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस (Nashik Police) अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर (Sociala Media) प्रसारित करु नये, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून नाशिककरांना खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी आंदोलन (Protest) सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता आहे. एकीकडे सोशल मीडियावर पोस्ट केल्याने कोल्हापूर (Kolhapur) शहरात मोठा तणाव निर्माण झाला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अलर्ट होत नाशिककरांना आवाहन केले आहे. सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित करु नये. तसे आढळून आल्यास कठोर कार्यवाही करण्याचा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमांतून धार्मिक आणि जातीय भावना दुखावून दोन समाजांत तेढ निर्माण होतील, असं स्टेटस (Status), व्हिडिओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एसएमएस (SMS) तयार करुन प्रसारित करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल. यासाठी नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ (Social Media Patrolling) ही व्यवस्था चालू केली आहे. पोलिसांकडून नाशिककरांना खबरदारीच्या सूचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सामाजिक पोस्ट, फोटो, मजकूर व्हायरल (Viral Post) करणाऱ्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांची सोशल मीडियावर नजर
पोलिसांनी नाशिककरांना (Nashik) सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस सर्व परिस्थिती हाताळण्यास सक्षम असून, सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान आणि विशेष दलाच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच नाशिक शहरासह जिल्ह्यातील सोशल मीडियावर नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नाशिक पोलिसांचे आवाहन
नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादी सारख्या समाज माध्यमांवरुन कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या, आव्हानकारक, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, फोटो अथवा संदेश प्रसारित करु नये, असं केल्यास त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हेही वाचा