Pune News : कोल्हापुरातील दगडफेक आणि अनुचित घटनांचा राज्यातील अनेक शहरांवर परिणाम होऊ शकतो. वाद पेटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अनेक शहरात खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबतच पुण्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरात दंगलसदृश परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांना शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातल्या अनेक ठिकाणांहून रुट मार्च काढण्यात आला. त्यात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीचा समावेश आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडामोडींवर आणि सोशल मीडियातील संदेशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्याही पोलिसांना सूचना आहेत. पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात थांबावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोल्हापूरातील घटनेचे पडसाद पुण्यात उमटू शकतात?
कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी ठेवण्यात आलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे अनेक हिंदूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. पुकारलेला बंद आणि केलेल्या ठिय्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं होतं. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन कोल्हापूर शहरात झालेल्या दगडफेकीची घटनादेखील घडली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांपैकी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. हुल्लडबाजांकडून दगडफेक सुरु झाल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नियंत्रण मिळवण्यास सुरु केली होती. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांना लाठीचार्ज सुरु केल्यानंतर रस्त्यावरुन एकच पळापळ सुरु झाली होती. पोलिसांनी काल साडे अकराच्या सुमारास परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र, काही वेळाने चिंचोळ्या भागात लपून बसलेल्या तरुणांनी पुन्हा हुल्लडबाजी सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या होत्या.
या घटनेचे पडसाद पुण्यात उमटू नये, यासाठी पुणे पोलिसांना खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलिसांना शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा आणि काही आढळल्यास माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिसरात गोंधळ निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातील काही परिसरातून रुट मार्च देखील काढला.
सोशल मीडियावर लक्ष ठेवा!
सध्या सोशल मीडियावर ठेवण्यात येणाऱ्या स्टेटसमुळे वाद किंवा मारहाण झाल्याचे प्रकार पुण्यातूनच नाहीतर राज्यातून समोर येत आहेत. त्यामुळे यांसारख्या आक्षेपार्ह स्टेटसवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
VIDEO : Pune Route March : कोल्हापुरात वाद, पुणे पोलीस सतर्क; अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा रुट मार्च