Nashik Kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) अपघातांच्या घटनांचे (Accident) प्रमाण वाढत असून आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कसारा घाटातील (Kasara Ghat) हॉटेल ऑरेंज परिसरात कंटेनर, पिकअप आणि ओमनी या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात होऊन दोन जैन महिला साध्वींचा मृत्यू झाला आहे. 


मुंबई-नाशिक मार्गावर (Nashik Mumbai Highway) अपघात वाढत असल्याचे चित्र आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक पर्यटक नाशिक, मुंबई प्रवास करत आहेत. त्यातच भरधाव वेगाने जाणाऱ्या, ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचाच प्रत्यय आज पहाटे पुन्हा एकदा आला. एका कंटेनरने पिकअपला आणि ओमनी कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पायी चालणाऱ्या दोघाही महिला साध्वींना धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक (Nashik) येथील पवननगर परिसरात चातुर्मास कार्यक्रमासाठी जात असताना काळाने घाला घातला आहे. या घटनेने जैन बांधवाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


परम पूज्य श्री. सिद्धाकाजी आणि परमपूज्य श्री. हर्षाईकाजी अशी या दोन महिला साध्वींची नावे आहेत. नाशिक शहरातील पवननगर परिसरात चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी साध्वी नाशिकला पहाटेच्या सुमारास निघालेल्या होत्या. पायी प्रवास करत असताना अचानक कंटेनरने समोरील पिकअप आणि ओमनीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप आणि ओमनी वाहनाचा चक्काचूर झाला. याचवेळी पायी जात असलेल्या दोन जैन साध्वींना वाहनाने धडक दिली. यात दोन्ही जैन साध्वींचा मृत्यू झाला आहे. 


पवननगरला चातुर्मासाचा कार्यक्रमाला येत होत्या


दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या अपघाताचा पंचनामा करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या दोन्ही साध्वी कसारा घाटातून नाशिक येथील पवन नगर येथे जात होत्या. पवन नगरमध्ये चातुर्मासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा अपघात झाला.  


कसारा घाट अपघाताचे केंद्र 


नाशिक-मुंबई महामार्ग अपघाताचे केंद्र बनत असून रोजच अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून अनेकदा वेगाने वाहन चालवल्याने, ओव्हरटेक करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक कसारा पोलीस आणि महामार्ग पोलीस आणि रुट पेट्रोलिंग टीम घटनास्थळी होऊन पुढील कार्यवाही करते. मात्र नेहमीच्या अपघातामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी कठीण होऊन बसला आहे.