Nashik Fraud Case : सध्या सगळीकडे शेअर्स ट्रेडिंगचे (shears Trading) मोठे फॅड आले आहे. कमी वेळात अधिक पैसे कमवण्याच्या नादात अनेकजण याकडे वळत आहेत. मात्र अनेकदा कमी वेळात अधिकचे पैसे कमवण्याच्या नादात लाखोंची फसवणूक (Fraud) झाल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. नाशिकमध्ये (Nashik) अशीच घटना घडली असून अनेक नागरिकांना शेअर्स ट्रेडिंगचा माध्यमातून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 


मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचा समावेश असल्याचे उघड झाले असून मुंबईत लाखो रुपयांचा गंडा घातल्यावर नाशिकमध्येही तिने तीन कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. पूजा विशांत भोईर (Pooja Vishant Bhoir) असे या संशयित तरुणीचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स बनविण्यासह मराठी बालकलाकाराची (Marathi Actor) आई म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र या प्रकरणाने तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेअर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई पोलिसांकडून पूजा भोईरला ताब्यात घेतले आहे. गुरुवारपर्यंत पूजा भोईर पोलिसांच्या ताब्यात असून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी ठाणे येथे रवाना झाले आहे.


दरम्यान एप्रिल महिन्यात शेअर्सच्या गुंतवणुकीतून 33 कोटी रुपयांचा अपहार करून अकरा जणांनी नाशिकच्या (Nashik) पन्नासपेक्षा अधिक जणांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यांनतर 22 मे रोजी तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला. त्या प्रकरणी गंगापूर रोड परिसरातील सिरीन मेडोज येथील रहिवासी अतुल सोहनलाल शर्मा यांनी सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. जून 2022 ते मे 2023 या कालावधीत शर्माची फसवणूक झाली. स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत शर्माकडून तीन कोटी पाच लाख अकरा हजार रुपये वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात घेतले. मात्र अपेक्षित परतावा न झाल्याने शर्मा यांनी विचारणा केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळत गेल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पूजा भोईर आणि विशांत भोईर या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


दरम्यान गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करणारे अतुल शर्मा हे गंगापूर परिसरात राहतात. शर्माचा क्रिकेटचा क्लास असून यात सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पूजा भोईरच्या ट्रेडिंगसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार शर्मा यांनी पूजा भोईरच्या ओळखीतील स्थानिक कलाकारांकडून माहिती घेतली. गंगापुरर रोडवरील एका ठिकाणी शर्माना संशयित दाम्पत्य भेटले. त्यांनी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर पूजावर विश्वास ठेवत शर्मासह नाशिकच्या अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. त्यावरून पुढे फसवणुकीसंदर्भात शर्मा यांनी तक्रार दाखल केली.