त्र्यंबकेश्वर : अधिक मासानिमित्त (Adhik Mas) त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या दर्शनासाठी रोजच भाविकांची गर्दी होत असून त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना याचा फटका बसत असल्याचे निदर्शनास येत होते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक देवस्थान (Trimbakeshwer Mandir) ट्रस्टने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन VIP Darshan) बंद करण्यात आले आहे. मात्र, केंद्र आणि राज्यस्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना दर्शन दिले जाणार आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. त्यातच यंदा अधिक मास आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. पाऊस सुरू असतानाही भाविकांची रीघ सुरूच असल्याचे चित्र आहे. त्यातच काही दिवसांपासून व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा रांगेत उभे असलेल्या भाविकांना दर्शनासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र होते. तसेच सार्वजनिक सुट्ट्या आणि आगामी काळात निज श्रावणानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे.
दरम्यान या निर्णयाबाबत त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबतचे पत्र दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी अथवा तोंडी आदेशाने व्हीआयपी दर्शनाची सुविधा देण्यासाठी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आणि मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचके यांची नेमणूक करीत असल्याचे आणि त्यांच्यामार्फत येणाऱ्यांना व्हीआयपी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्र देवस्थानला दिले आहे. सर्वसामान्य भाविक हजारो रुपये खर्च करून, वेळ देऊन येथे येतो, चार ते पाच तास रांगेत उभा राहतो. मात्र, पाच सेंकदात गर्भगृहाच्या समोरून बाजूला केला जातो. त्यात 200 रुपये देऊन दोन तास रांगेत उभे राहणारेही असतात. तसेच त्र्यंबकेश्वर येथे दररोज 15 हजार भाविकांचे दर्शन होत असते, मात्र दुसरीकडे व्हीआयपी लोक दर्शनाला आल्यास सामान्य भाविकांची पंचाईत होते.
दर्शबारीत भाविकांना लाडू, बिस्किटे देणार...
तसेच सध्या अधिक मास आणि लवकरच निज श्रावणाला देखील सुरवात होणार असल्याने दर्शनबारीतील भाविकांसाठी त्र्यम्बक देवस्थान प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दर्शनबारीत भाविकांना तासनतास उभे राहावे लागते, यात आबालवृद्धांसह लहान मुलेही उभी असतात. अशावेळी तहान लागणे, भूक लागणे अनेकदा भाविकांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर करण्यासाठी मंदिर ट्रस्ट विश्वस्तांनी भाविकांसाठी दर्शनानंतर राजगिरा लाडू देण्यात येणार आहेत. तसेच रांगेत बिस्कीट पुडे, पाण्याची बाटली मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर संबंधित बातमी :