Nashik Rain Update : उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरवात झाली असतानाच ऐन एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा तडाखा दिला. नाशिकमध्ये (Nashik) अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात सुरगाणा तालुक्यात वीज पडून बैल जोडी ठार झाली तर जळगाव जिल्ह्यात नऊ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.


सुरुवातीच्या दोन अवकाळी पावसानंतर (Unseasonal Rain) चार-पाच दिवस उन्ह वाढू लागल्याने पाऊस येण्याची चिन्हे मावळली होती. मात्र पुन्हा एकदा वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच उन्हाची तीव्रता ही कमी झाल्याने कमाल तापमानात (Climate Change) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे राज्यभरात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात हलका ते मुसळधार प्रकारचा अवकाळी पाऊस बरसला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना घडल्या.


नाशिक शहरासह जिल्ह्यातही (Nashik District) उन्हाचे चटके जाणवू लागले होते. मात्र कालपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण दिसू लागले आहे. तर काल सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, चांदवड, निफाडच्या काही भागात अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


सुरगाणा तालुक्यात वीज पडून दोन बैल ठार 


नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यात वीज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथे ही घटना घडली आहे. काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यावेळी शिवपाडा येथील शेतकरी चिंतामण वामन हाडस हे मांजरपाडा शिवारात बैल चारत होते. त्यांनी तात्काळ बैलांना घेत जवळच्या शेतातील झापावर दावणीला बांधले. शेतकरी पावसाच्या भीतीने घरी परतले. मात्र विजांच्या कडकडाटात सुरु असलेल्या अवकाळी पावसात वीज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


जळगावात नऊ शेळ्या ठार 


जळगावातील (Jalgaon) मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे विज कोसळून नऊ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी थोडक्यात वाचला असून या घटनेने मोठी खळबळ उडाली. रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावालगत गेला होता. सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून नऊ शेळ्या जागीच ठार झाल्या. तर या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारार्थ मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे.