Nashik Sinnar Crime : गेल्या काही दिवसात सिन्नर (Sinnar) तालुक्यात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. अशातच निफाड तालुक्यातुन पळून आलेल्या आणि सिन्नर परिसरात वास्तव्य करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कृष्ण असं मृत बालकाचं नाव आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे ही घटना घडली आहे. निफाडमधील (Niphad) बोकडदरा येथील गणेश उर्फ अमोल नाना माळी आणि त्याची दोन मुलांची माता असलेली प्रेयसी बोकडदरा येथून पसार झाले होते. हे दोघे पंधरा दिवसांपासून गुळवंच येथे संपत कांगणे या शेतकऱ्याकडे कामास होते. प्रियकराबरोबर असलेल्या काजलला चार वर्षांचा मुलगा असल्याने तो देखील सोबत होता. दरम्यान कृष्णाने शर्ट उलटा घातल्याची कुरापत काढत प्रियकर गणेशने त्याला काठीने मारहाण केली. यात कृष्णाच्या डोक्याला मार लागला. थोड्यावेळाने गणेशने कृष्णाला चहा पाजला. मात्र, त्याला त्रास होऊ लागल्याने दोघांनी त्याला दुचाकीहून खासगी बाल रुग्णालयात दाखल केले.
खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात (Sinnar Rural Hosiptal) नेण्याचा सल्ला दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बालक मृत झाल्याचे सांगितले. त्यावेळी गणेशने लघु शंकेचे निमित्त करत तिथून पळ काढला. दरम्यान डॉक्टरांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. आई काजल हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी संशयित आरोपीला पकडण्यासाठी बोकडदरा येथील पोलीस पाटील आणि सरपंचांशी संपर्क साधला. त्यानंतर गणेशलाचौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान गणेशची नातेवाईक असलेल्या महिलेने त्याच्या वडिलांना फोन करत ठिकाण विचारले. त्यावरुन पोलिसांना गणेश मोहाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी इथे धाव घेत गणेशला ताब्यात घेतले. बालकाची आई काजलने दिलेल्या फिर्यादीवरुन अमोल माळी याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत गणेशला बेड्या ठोकल्या आहे.
24 तासांत अटक
दरम्यान सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सिन्नर ग्रामीण रुग्णालय गाठले. बालकांच्या आईकडून सर्व परिस्थिती जाणून घेत तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार निफाड तालुक्यातील बोकडदारा येथील सरपंच यांच्याशी संपर्क साधला. त्याचबरोबर गणेशच्या आई-वडिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून गणेशचा पत्ता मिळाला. त्यानुसार पोलिसांनी दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील जाऊन गणेश माळी याच्या मुसक्या आवळल्या. मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा पद्धतीने क्रूर होऊन कोवळ्या जीवाचा जीव घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.