Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता एप्रिल महिन्यात देखील पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) शुक्रवारी अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळताना पाहायला मिळाला. तर सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्याला विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. तर, वीज पडल्याने एक शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्याला वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा या गावाला सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास वादळाचा तडाका बसून गावातील विजेचे लोखंडी पोल हे अर्ध्याहून पूर्ण वाकून गेले. तसेच काही घरावरील आणि शेतातील शेडवरील पत्रे देखील उडाले. तर कन्नड तालुक्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने उरलेसुरले पिक देखील जमीनदोस्त झाले आहे. सिल्लोडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हा:हाकार पाहायला मिळत आहे. तर सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील आबादान भिका राठोड युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
पुन्हा पिकांना फटका
मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. रब्बी पिक अक्षरशः मातीमोल झाली होती. त्यातच आता एप्रिल महिन्यात देखील पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उरलेसुरले पीक देखील हातून जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे गहू, बाजरी, सूर्यफूल आणि मकाच्या पिकांचे नुकसान झाले आहे तर, फळबागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आधी अतिवृष्टी अन् आता अवकाळी
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर 8 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे मराठवाडा विभागात एकूण 1 लाख 22 हजार 18 शेतकऱ्यांचे समारे 60 हजार 402 हेक्टरवरील नुकसान झाले आहे. त्यातच आता एप्रिल महिन्यात देखील पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता उरलेसुरले पीक देखील गेल्यास यंदाचं पूर्ण वर्षच वाया जाणार आहे. त्यामुळे आता सरकारने पंचनामे करून मदत करण्याची मागणी होत आहे.
आज सकाळी पुन्हा पावसाची हजेरी
शुक्रवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आज सकाळी शनिवारी देखील काही भागात पाऊस पडताना पाहायला मिळाला. पैठण शहरात आज सकाळी 6.20 वाजता जोरदार पावसाने हजेरी लावली. तर बालानगर परिसरात देखील आज सकाळी पाऊस झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
वाहन पकडल्यावर होणारे वाद टाळण्यासाठी 'हे' करा; वाहतूक पोलिसांनी सुचवले पर्याय