Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील (Jalgoan) कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या  माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हयात पाचोरा येथे येत आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांची सभा देखील पाचोरा येथे होत असल्याने ठाकरे सभेत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) हे 23 एप्रिलला जळगाव (Jalgoan) जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. येत्या 23 एप्रिलला उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) येथे विराट सभा होणार आहे आणि आता या सभेचा टीझर ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह आता वाढला आहे. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी (Vaishali Suryvanshi) यांनी या विराट सभेचे आयेजन केले आहे. शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सेनेचे सर्वच्या सर्व पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले होते. या घटनेनंतर जळगाव जिल्हयात ठाकरे गटात मोठे खिंडार पडल्याच पाहायला मिळाले होते. यानंतर उर्वरित कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना उत्साह देण्याच्या निमित्ताने आणि माजी आमदार तात्या पाटील यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.


उद्धव ठाकरेंच्या यापुर्वीही छत्रपती संभाजीनगर, खेड, मालेगाव येथे जाहीर सभा झाल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याआधी झालेल्या सभांमधून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. महागाई, बेरोजगारीसह शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील सभेतून उद्धव ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून महत्वाचा शिवसैनिक असलेल्या गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेसोबत जात जोरदार धक्का दिला होता.  


अटल मैदानावर सभा 


तर दुसरीकडे कारण जळगाव जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार शिवसेना शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यात पाचोऱ्याचे आ किशोर पाटील यांचाही त्यात समावेश आहे. आ किशोर अप्पा पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे गटाची धुरा आपल्या खांद्यावर घेत आपल्या भावाला राजकीय दृष्ट्या आव्हान निर्माण केल्याचं पाहायला मिळत असल्याने उद्धव ठाकरे यांच्या या सभेला राजकीयदृष्ट्या एक वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांची सभा पाचोरा येथील अटल मैदानावर होत आहे.