Nashik Bajar Samiti : मनमाड बाजार समिती (Manmad Bajar Samiti) मध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बाजार समिती कार्यालयाच्या आवारातच निवडणूक निर्णय अधिकारी पोलिस यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांना भिडत हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. 


सध्या नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमध्ये निवडणुकांची (Bajar Samiti Election) रणधुमाळी सुरू आहे. अशातच मनमाड येथील बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज माधारी घेण्याच्या दिवशी चांगलाच राडा पाहायला मिळाला. नाशिक बाजार समितीसह (Nashik Bajar Samiti) एकूण 14 बाजार समिती निवडणूक सध्या सुरू आहेत. गुरुवार 20 एप्रिल रोजी माघारीचा दिवस होता. या दिवशी अनेक बाजार समित्यांमधून उमेदवारांनी माघार घेतल्या तर मनमाड येथील बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे व पोलिसांसमोरच शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचा गट व उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे (Thackeray Sena) जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या गटात धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाले. 


यावेळी एका उमेदवाराच्या दोन गटातील अर्ज माघारीच्या वेळी एकमेकांकडे रागाने पाहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोरच टेबलवर चढून दोन्ही गटात हाणामारी झाली. बाजार समितीच्या 18 जागांसाठी 125 उमेदवारांनी अर्ज भरले होते. तर माघारीच्या दिवशी 84 उमेदवारांनी माघार घेतली आता 18 जागांनी 41 उमेदवार अशी अटीतटीची लढत होणार आहे. एका उमेदवाराने दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता. ते बाहेरगावी असल्याने त्याला माघारीसाठी येता आले नाही. उमेदवाराशी व्हिडिओ कॉलिंग ही झाले, परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. त्यामुळे त्याच्या वतीने त्याची मुलगी व अनुमोदक सूचक माघारीसाठी सभागृहात पाठवले होते.. मात्र यावर दुसऱ्या गटांनी आक्षेप घेत दोन्ही गटांत बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. 


दरम्यान घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पांगवल्या नंतर थोडी शांतता झाली.दरम्यान, सध्या तरी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एकूणच माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी उशीरानंतर सर्व बाजार समित्यांचे चित्र स्पष्ट झाले असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या लढती पाहायला मिळणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :